मच्छिन्द्रा येथील धाडसी महिलांनी पकडली दारू

पोलिसांना अनेक वेळा निवेदन देऊनही अवैध दारूविक्रीकडे दुर्लक्ष....

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मच्छिन्द्रा येथे अवैधरित्या दारुविक्री सुरु होती. यावर आळा बसावा म्हणून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु दारुविक्री मात्र बंद होत नव्हती. शेवटी महिलांनीच पुढाकार घेत रविवारी दि. 27 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास दारु गावात आल्याबरोबर धाड टाकली व पोलिसांना दारू पकडून दिली. यावेळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. यावेळी 25 ते 30 दारूचे पव्वे पोलिसांनी जप्त केले असून घटनास्थळी 15 ते 20 पव्वे फुटलेल्या अवस्थेत आढळले.

तालुक्यातील मच्छिन्द्रा येथेही मागील काही दिवसांपासून अवैधपणे दारुविक्री सुरु आहे. या दारूला वैतागलेल्या महिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत तशी तक्रारही दाखल केली होती. तरीही दारुविक्रेते शिरजोर असल्याने ते पोलीस तक्रारीला न जुमानता राजरोसपणे दारुविक्री करीत होते. अशातच दि. 27 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दारू विक्रेता हार्दिक दारू आणायला शहरात गेल्याची कुणकुण येथील महिलांना लागलेली होती.

दारू विक्रेता केव्हा येईल याची गावातील महिला दबा धरून वाट पाहत होत्या. अवैध दारुविक्रेता आल्याबरोबर महिलांनी त्याला गराडा घातला. आणि त्याला दारूच्या पेटीसहित रंगेहात पकडले. तसेच मारेगाव पो. स्टे. ला माहिती कळविली. पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यावेळी मारोती घाटे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून रमेश पेंदोर पळून जाण्यात यशस्वी झाला.

खरे सूत्रधार मोकाटच !
दारू पकडण्यासाठी महिलांना पुढाकार घ्यावा लागला. महिलांनी हिम्मत करून दारू पकडलीही. एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी यातील खरे आणि महत्वाचे सूत्रधार अजूनही मोकाटच असल्याचे गावातील महिलांनी सांगितले. एकाला ताब्यात घेतल्याने हा प्रश्न मिटणार नसून उर्वरित सर्वांना पकडून दारुविक्रीला आळा घालावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

हे देखील वाचा: 

मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

Comments are closed.