सुशील ओझा, झरी: पिवरडोल येथे वाघाने झडप घालून गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. ३१ डिसेंम्बरला १ वाजताच्या सुमारास जंगलात गुराखी गाई चारत असताना वाघाने गाईवर हल्ला केला. यात शंकर शिवराम उईके रा. पिवरडोल यांना त्यांचे पशुधन गमवावे लागले.
सदर घटनेची माहिती वनविभाग कार्यालयाला देऊन सुद्धा कोणताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही अशी माहिती पशुधन मालक व गुराख्याने दिली आहे. आतापर्यंत या परिसरात वाघाच्या हल्ल्यात डझनच्या वर जनावरे जागीच ठार झाली आहेत. मात्र अजूनही कोणत्याच पशुधन मालकाला नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.
तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून परिसरातील गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पिवरडोल परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. पिवरडोल रिसरातील अनेक पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले होत असून पशुधन मालकाचे नुकसान होत आहे.