सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला

सुदैवाने दोर सुटल्याने वाचला बैलाचा जीव

जितेंद्र कोठारी, वणी: सुकनेगाव शिवारात आज दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान एका वाघाने एका बैलावर झडप घातली. यात बैल जखमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुकनेगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाचा शेतातील जनावरांवर हल्ला ही नित्याचीच बाब झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की सुकनेगाव येथील शेतकरी भारत काकडे यांचे गावा लगतच शेत आहे. आज सकाळी ते शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. तर बैल हा शेतातील गोठ्यात एका खुट्याला बांधून होता. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास नाल्याजवळ वाघ पाणी पिण्यासाठी आला. वाघाची नजर बैलावर जाताच वाघ बैलाच्या दिशेने गेला व वाघाने बैलावर झडप घातली.

दरम्यान खु्ट्याची दोरी सैल असल्याने बैलाने तिथून पळ काढला. बैलाच्या आवाजाने परिसरातील शेतक-यांनी आरडाओरड करताच वाघाने तिथून पळ काढला. या हल्ल्यात सुदैवाने बैलाचा जीव वाचला असला तरी बैलाला शरीरावर अनेक ठिकाणी ईजा झाली आहे.

परिसरातील शेतकरी शेतमजूर दहशतीत
कायर, गोडगाव, इजासन, नवरगाव, सुकणेगाव, रासा, विरकुंड इत्यादी परिसरात वाघाचा मुक्त संचार आहे. वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. मात्र परिसरात वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर कामाला शेतात जाण्यास धजावत आहे. विरकुंड येथे तर एका तरुणाचा तर वाघाशी आमना सामना झाला होता. मात्र त्वरित झाडावर चढल्यामुळे त्या तरुणाचा जीव वाचला होता.

हे देखील वाचा:

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

शहरातील अर्ध्या रस्त्यांवर ‘ऑटो’ व ‘ट्रॅव्हल्स’चा ताबा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.