धक्कादायक: नवकार नगर येथे नागरिकांची पहाट उजाडली वाघाच्या डरकाळीने…..

सावधान... ! वणी शहराच्या वेशीवरील मानवी वस्तीत वाघ आलाये... वाघाच्या हल्ल्यात रोही जखमी ?

जितेंद्र कोठारी, वणी: शहराच्या नांदेपेरा रोडवर असलेल्या नवकार नगरमधल्या नागरिकांची आजची पहाट वाघाच्या डरकाळीने उजाडली. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास न्यू व्हिजन शाळेच्या मागील भागात असलेल्या नवकार नगर येथे वाघ आढळून आला. या भागात एक रोही जखमी अवस्थेत आढळन आला आहे. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात हा रोही जखमी झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. गेल्या आठवड्यात गुंजच्या नाल्याजवळ सीसीटीव्ही कॅमे-यात वाघ कैद झाला होता. आता थेट शहराच्या वेशीवर असलेल्या मानवी वस्तीत वाघ पोहोचल्याने या भागातील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.

नांदेपेरा रोडवर न्यू व्हिजन शाळेच्या मागील भागात नवकार नगर हा परिसर आहे. या कॉलोनीत जितेंद्र पुनवटकर यांचे घर आहे. या लेआऊटतच्या लगत गुंजा नाला जातो. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पुनवटकर यांना वाघाची डरकाळी ऐकू आली. त्यामुळे ते चांगलेच भयभीत झाले. त्यांच्या घराच्या भींतीजवळ त्यांना एक रोही जखमी अवस्थेत उभा असल्याचे आढळून आले. तसेच काट्यांचे कुंपण अस्तव्यस्त आढळून आले. त्यामुळे वाघाने रोहीच्या कळपावर हल्ला केला व त्यात एक रोही जखमी झाला असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

नवकार नगरमध्ये वाघ दिसल्याची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जागेची पाहणी केली. या भागात 3 मोठ्या शाळा आहेत. सकाळी या परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांची व पालकाची रेलचेल असते. अनेक पालक विद्यार्थ्यांना दुचाकीने शाळेत सोडतात. वाघाचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील एक शाळा देखील एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील लोकांसह पालकही दहशतीत आले आहे. विशेष म्हणजे या परिसरात काही शेतही आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व मजूर देखील दहशतीत आले आहे.

शहराला वाघांचा विळखा..
सध्या संपूर्ण वणी शहराच्या सभोवताल वाघांचा डेरा दिसून येत आहे. आधी शहराच्या दूर असलेले वाघोबा आता शहराच्या आणखी जवळ येताना दिसत आहे. सुमारे 8 वाघांचा शहराच्या आसपास वावर असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात गुंजचा मारोती जवळील एका कोंबडीच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात वाघ कैद झाला होता. भालर खाण परिसरात दर आठवड्यात वाघांचे दर्शन होते. तीन दिवसांआधी एकाने याचा मोबाईलवर चित्रीकरण करून व्हायरल केले होते. तर आज पहाटे नांदेपेरा रोडजवळील मानवी वस्तीत वाघाचे दर्शन झाले.

वनमंत्र्यांना याची माहिती दिली – आ. बोदकुरवार
शहराच्या वेशीवर वाघ येणे ही धोकादायक बाब आहे. आज सकाळी याबाबत काही लोकांनी माहिती दिली असता मी तात्काळ वनमंत्री व मुख्य वन संरक्षक यांना याची माहिती दिली. कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांच्याजवळ केलीये. त्यावर त्यांनी दोन दिवसात वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन आढावा घेणार असल्याचे आश्वासन दिले.
– आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाघ आहेत. मुंगोली, रासा, घोन्सा, विरकुंड, बोर्डा, उकणी, भालर, सुंदरनगर या भागात वाघाचे कायम दर्शन होत राहते. रांगणा भूरकी शेतशिवारात एका तरुणाचा वाघाने फडशा देखील पाडला. शहराच्या दूर असलेले वाघ आता शहराच्या वेशीवर आल्याने नागरिक चांगलेच दहशतीत आले आहे. वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

हे देखील वाचा:

पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…

मृतदेह कुठे आहे…? अजय देवगनचा दृष्यम 2 आज रिलिज….

Comments are closed.