गुटखा, सुगंधी तंबाखू तस्करी व विक्रीची पाळंमुळं खोलवर
एफडीआय व पोलीस विभाग तस्करीपासून अनभिज्ञ ?
विवेक तोटेवार, वणी: राज्यभरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. वणी व परिसरात याची दिवसाधवळ्या विक्री सुरू आहे. वणी हे तस्करांचे मुख्य केंद्र असून वणीतूनच परिसरात गुटखा, प्रक्रिया केलेला तंबाखू व सुगंधी तंबाखू पुरवला जातो. मात्र एफडीआयचे अधिकारी व पोलीस विभागाच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधाशिवाय हे शक्य नसल्यानेच हा गोरखधंदा दिवसेंदिवस फोफावत असल्याचे दिसून येत आहे.
वणीतील दोन मुख्य व्यापारी या तस्करीतील मोठे मासे आहेत. एक व्यापारी हा सुंगधी तंबाखुचा डॉन समजला जातो व हाच या तस्करीतील गॉडफादर आहे. ही तस्करी सोयिस्कररित्या चालण्यासाठी अधिकारी व पोलीस विभाग सांभाळण्याची जबाबदारी ही याच डॉनकडे आहे. सुगंधी तंबाखूची तस्करी वणी व परिसरात मोठ्या प्रमाणात होते. या क्षेत्रात या तस्कराचीच एकाधिकारशाही आहे. तर दुसरा तस्कर हा गुटखा व नकली सुगंधी मालाची तस्करी करतो.
वणी व परिसरात सुगंधी तंबाखू दुस-या कुणाकडेही मिळत नाही. सुगंधी तंबाखू नागपूरवरून ट्रान्सपोर्टद्वारा वणीत येतो. हा माल सुमारे 50 पेटी इतका असतो. एसपीएम शाळेच्या मागील मैदानात हा माल इतर मालासोबत उतरवला जातो. प्रत्येक पेटी ही पांढ-या प्लास्टिकच्या पिशवीत येते त्यामुळे आत कोणता माल आहे याचा कुणालाही संशय येत नाही. हा माल तिथूनच ताबडतोड सर्व ठिकाणी पोहोचवला जातो. तर उरलेला माल हा डॉन घरी लपवून ठेवतो.
दुसरा मोठा मासा हा गुटखा व नकली सुगंधीत तंबाखूची तस्करी करण्याचे काम करतो. वर्धा आणि हिंगणघाट येथून तो व्यापारी माल बोलावतो. वणीत माल आल्यानंतर स्विफ्ट डिझायर तर कधी वॅगन आरने हा माल मारेगाव, घाटंजी, पांढरकवडा इथे पोहोचवला जातो. कधी लाल मारोती गाडीचाही यासाठी वापर होतो. कुणाला संशय येऊ नये किंवा नजरेत भरू नये साठी भरधाव वेगाने गाडीने माल पोहोचवून लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाते.
पोलीस विभागाची चुप्पी का?
गुटखा व सुगंधी तंबाखूवर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीआय व पोलीस विभागाची आहे. मात्र या विभागाचेच यात तोंड रंगलेले दिसून येत आहे. एका ‘दबंग’ पोलीस कर्मचा-याकडे हे संपूर्ण काम दिलेले आहे. कोणताही ‘धीर’ न धरता तस्करांकडून वसुलीचे काम केले जाते. ‘पटेल’ असा ‘माल’ मिळाला की ही तस्करी सोयिस्कररित्या पार पडली जाते. मात्र यात सर्वसामान्यांना कर्करोगाचा विंचू ‘चावला’ तरी प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही.
एफडीआय म्हणते कुठे सुरू आहे तस्करी?
अन्न व औषधी पुरवठा विभागाचे निरिक्षक सूर्यवंशी यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी असा कोणताही प्रकार वणीत सुरू नसल्याचे सांगितले. गुटखा व सुगंधी तंबाखू राजरोसपणे तस्करी व विक्री सूर असताना एफडीआय मात्र गांधारीपणे डोळ्यावर पट्टी बांधून आहे. त्यातच वणीत गेल्या आठवड्यात एफडीआयच्या एका अधिका-याने भेट देऊन तंबाखू व्यापा-यांची भेट घेतली होती. मात्र कुणावरही कारवाई न झाल्याने ही भेट ‘पान सुपारी’ची असल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.