ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू तर चालक जखमी

वेगाव जवळ भीषण अपघात, नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी

भास्कर राऊत, मारेगाव: कोलगाव-वेगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात दोघे जण दबले. या अपघातात एक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारोती वालकोंडावार (24) असे मृतकाचे नाव असून चालक भारत बोधाडकर (28) हा जखमी झाला आहे. सदर ट्रॅक्टर मार्डीजवळील एका शेतामध्ये काम करून रोटावेटर घेवून गावाकडे परत येत होते. दरम्यान हा भीषण अपघात झाला.

मृतक मारोती वालकोंडावार हा वेगाव येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टरवर मजूरी करायचा. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे सुरू आहे. मंगळवारी सकाळी मारोती हा ट्रॅक्टर चालक भारत बोधाडकर (24) याच्यासह ट्रॅक्टरवर शेतीच्या कामासाठी गेला. रात्रीच्या सुमारास हे दोघे मार्डीजवळील एका शेतात शेतीचे काम आटपून वेगावला परत येत होते.

कोलगाव-वेगावच्या रस्त्याच्या मध्ये एक कॅनल आहे. या कॅनलवर एक पूल आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास या पुलावरचा चढ चढत असताना ट्रॅक्टरच्या बॉडीचे चाक वर आले. यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कँनलच्या नाल्यात कोसळला. या ट्रॅक्टर खाली मारोती व भारत दोघेही दबले गेले.

दरम्यान या रस्त्यावरून जाणा-या वेगावच्या काही दुचाकीस्वारांना या अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने गावात माहिती पोहचवली. गावकरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली. मात्र छातीवर ट्रॅक्टरचा दबाव आल्याने मारोतीचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. तर चालक भारत याचा पाय आणि कंबर ट्रॅक्टरखाली दबलेले होते. गावक-यांनी तातडीने भारत याला बाहेर काढले. 

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान मृतकाला ट्रॅक्टरखालून काढण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. जखमी चालक  भारत याला रात्री वणी येथे उपचारासाठी दाखल केले. त्याला पायाला व कंबरेला मार लागला असून सध्या त्याची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

घरातील आधार हरपला
मृतक मारोती वालकोंडावार अविवाहित होता. तो घरातील कर्ताधर्ता व आई वडिल, बहिणीचा आधार होता. मोलमजुरी करून तो कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावायचा. मारोतीच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मृतक मारोती वालकोंडावार यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा:

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

गाडीत हवा भरण्याचे पैसे मागितले म्हणून मारहाण

Comments are closed.