जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, चना खरेदी करुन चुकाऱ्याची रक्कम हडप करणारे व्यापारी धीरज सुराणा याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वणी पोलिसांनी मंगळवार 18 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी आरोपी धीरज सुराणा याला आज वणी न्यायालयात हजर करुन अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने आरोपीची 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपी व्यापाऱ्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी तसेच खरेदी केलेल्या शेतमालाची विल्हेवाट आरोपीने कुठे लावली याचाही तपास पोलीस करणार आहे. दिवसरात्र घाम गाळून पिकवलेले शेतमालाची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
काय आहे हे प्रकरण: आरोपी धीरज अमरचंद सुराणा हा कृषी उत्पन्न बाजार समिती वणीमध्ये परवानाधारक धान्य खरेदीदार वर्धमान ट्रेडिंग कंपनीचा संचालक आहे. आरोपी यांनी 5 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत बाजार समिती ई नाम योजने अंतर्गत 147 शेतकऱ्यांकडून 1 कोटी 13 लाख 78 हजार 131 रुपयांचा 1935.02 क्विंटल सोयाबीन, चना व तूर शेतमाल खरेदी केला. मात्र ठराविक कालावधीत शेतकऱ्याचे चुकारे, बाजार फी, सुपरव्हीजन फी व अडतची रक्कम सदर व्यापाऱ्यांनी भरणा केली नाही.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कमेसह 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुपये थकविल्या प्रकरणी बाजार समिती सचिव अशोक काशिनाथ झाडे यांनी 28 फेब्रुवारी 2022 रोजी व्यापारी धीरज अमरचंद सुराणा व जामीनदार रुपेश नवरत्नमल कोचर विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 34, 406 आणि 420 अनव्ये गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला होता. तब्बल 78 दिवसाच्या फरारी काळात आरोपीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान वणी पोलीस आरोपीचा शोध घेण्यास सपशेल अपयशी ठरली. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आरोपी सोमवार 18 एप्रिल रोजी वणी येथे आपल्या घरी परतला. कुटुंबीयांनी समज दिल्यानंतर आरोपी धीरज सुराणा हा आपल्या मित्र श्रीकांत सोनटक्के यांच्या दुचाकीवर बसून पोलीस स्टेशनमध्ये आला व अटक करुन घेतली होती.
हे देखील वाचा:
Comments are closed.