बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळी सुटी निमित्त पर्यटनाला गेलेल्या एका कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरफोडीच केली नाही तर अंगणात लावलेली दुचाकी देखील चोरून नेली. या घरफोडीत चोरट्यांनी 15 हजारांची रोख रक्कम व 25 हजारांची दुचाकी असा सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. वणीतील प्रगतीनगर येथे सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरफोडीच्या सातत्याने घडणा-या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टूर, लग्न यानिमित्त बाहेरगावी जाणे वणीकरांना चांगलेच महागात पडत आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सुप्रतोष संतोष गौरकार हा शिंदोला येथील रहिवासी आहे. त्याचे मामा गजानन महादेव पावडे हे वणीतील प्रगतीनगर येथे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. पावडे हे कुटुंबीयांसह कोंकण येथे फिरण्यासाठी जाणार होते. त्यामुळे 11 जून रोजी त्यांनी त्यांचे भाचे सुप्रतोष याला कॉल केला. त्यांनी आजी घरी एकटीच असल्याने तिला शिंदोला येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर ते कुटुंबीयांसह फिरण्यासाठी निघून गेले. दुस-या दिवशी सुप्रतोष घरी आला व आजीला गावी घेऊन गेला.
जाताना त्याने घराच्या मुख्य दरवाज्याला कूलूप लावले. मामाची दुचाकी अंगणात एका बाजूला लावली व त्याने अंगणातील लोखंडी गेटला कुलूप लावले. सोमवारी दिनांक 16 आजीने वणीला सोडण्याची विनंती केली. त्यामुळे तो आजीला घेऊन प्रगतीनगर येथे मामाच्या घरी गेला. मात्र तिथे गेल्यावर त्याला धक्काच बसला. त्याला अंगणातील गेटला व दरवाज्याला कुलूप नसल्याचे आढळले. त्याने अंगणात प्रवेश केला असता त्याला तिथे दुचाकी आढळली नाही.
त्याने घरात प्रवेश केला असता त्याला घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले आढळले. आलमारी फोडलेली दिसली. त्याने याबाबत मामाच्या साळ्याला कॉल केला असता त्याने रविवारी संध्याकाळी तो झाडांना पाणी देण्यासाठी आला, तेव्हा त्याला गेट व घराला कुलूप होते, असे त्याने सांगितले. त्यामुळे रविवारी रात्री घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. या घरफोडीत चोरट्याने आलमारीत ठेवलेली 15 हजारांची रोख रक्कम व हिरो पॅशन प्रो ही दुचाकी (MH29 AH4193) चोरून नेली.
सुप्रतोषने वणी पोलिसांना याबाबत सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 305(a) 331(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस प्रशासन सातत्याने अपयशी !
सध्या घरांना चांगली कुलपे, लोखंडी दरवाजे लावूनही घरफोड्या होत आहेत. घरफोडी झाली की डॉग स्क्वॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना बोलवण्यात येते. मात्र त्याचे पुढे काहीही होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच घरफोड्या, चोऱ्यांच्या तपासात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आपल्या घरी चोरी होईल, अशी भिती प्रत्येक कुटुंबाला वाटू लागली आहे. अनेक कुटुंबे परगावी जाण्याचे टाळत आहेत. तर जे जाईल त्यांचे घर फुटत आहे. त्यामुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे.



Comments are closed.