शहरातील अर्ध्या रस्त्यांवर ‘ऑटो’ व ‘ट्रॅव्हल्स’चा ताबा
ग्राउंड रिपोर्ट - साई मंदिर, बस स्थानक, टिळक चौक येथील रस्ते झाले अरुंद
जितेंद्र कोठारी, वणी: एसटी कामगारांच्या संपामुळे सध्या खासगी प्रवासी वाहतुकदारांचे चांगलेच फावत आहे. मात्र ऑटो व ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी आता इतर वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरातील अर्ध्या अधिक प्रमुख रस्त्यांवर ऑटोचालकांनी कब्जा केला आहे. तर बस स्थानक समोर आणि वरोरा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सने ताबा घेतल्यावर चित्र दिसत आहे. वणी येथे वाहतूक विभागाची उपशाखा कार्यरत असताना मात्र शहरातील ट्राफिक सर्वसामान्य चालकाच्या अंगावर काटा आणणारा आहे.
चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर पर्यंत सिमेंटरोड बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर एका बाजूने वाहतूक सुरु असताना मात्र ट्रॅक्टर, शेती अवजारे व नादुरुस्त वाहने रस्त्यावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेकदा ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण होते. साई मंदिर ते नांदेपेरा रोडवरील टर्निंगवर अक्षरशः ऑटो चालकांनी ताबा मिळवला आहे. रस्त्याच्या मधोमध रांगेत ऑटो उभे असल्यामुळे इतर वाहन धारकांना आपले वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागते.
बस स्थानक समोर उपाध्ये लॉज ते मनोज पान सेंटरच्या दुकानापर्यंत खासगी ट्रॅव्हल्स बस तसेच राजूर, मारेगाव जाणाऱ्या ऑटोची गर्दी वाहतुकीला अडथळा आणणारी आहे. या परिसरात ऑटोचालकांवर कोणाचाही नियंत्रण नसल्याची स्पष्ट जाणीव नागरिकांना होते. प्रवाशांच्या शोधात 5 ते 7 ऑटो झुंडीने येथे उभे असतात. इतर वाहनचालकांनी हॉर्न वाजवूनही ते येथून हलत नाहीत. अशा परिस्थिती ऑटो अपघातांनाही निमंत्रण देत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत वाहतूक शिपायाचे मात्र केवळ मासिक ‘टारगेट’ पूर्ण करण्याकडे लक्ष असल्याचे बोलले जात आहे.
टिळक चौक ते वरोराकडे जाणाऱ्या मार्गावरील परिस्थितीही काही वेगळी नाही. नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि माजरी, वरोरा, शिरपूर, शिंदोलाकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोच्या गर्दीने हा रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. या मुख्य मार्गावर ऑटोसह भेल, पाणीपुरी व चाट सेंटरचे अतिक्रमण सुद्धा वाहतुकीस अडचण निर्माण करीत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन व वाहतूक पोलीस उंटावर बसून शेळ्या हाकताना दिसत आहे.
वाहतूक पोलिसांचे ‘टारगेट’ फक्त दुचाकी चालक
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे फज्जा उडाला असता वाहतूक विभागाने बाहेर गावावरून कामानिमित्त वणी शहरात येणाऱ्या दुचाकी यी ‘टारगेट’वर आहे. कोरोना काळात ऑटोमध्ये कोंबून प्रवासी वाहतूक होत असताना मात्र ट्रिपल सीट दुचाकी वाहनांचे चालान फाडण्यास वाहतूक कर्मचारी कुठलीही कसर सोडत नाही. ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे ऑटोचालक व खासगी वाहनांवर कारवाई होत नाही असा आरोप करत त्याचा वचपा दुचाकीं चालकांवर काढला जातो, अशी तक्रार दुचाकी चालकांची आहे.
हे देखील वाचा:
मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…
Comments are closed.