विलास ताजने, मेंढोली: शिंदोला येथील एका ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेले. त्यामुळे सदर शिवारातील वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू न झाल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला येथील वसंत जिनिंग परिसरातील ट्रान्सफॉर्मर वरून बारा- तेरा शेतकऱ्याच्या शेतात सिंचनासाठी वीज पुरवठा जोडलेला आहे. परंतु सदर ट्रान्सफॉर्मर मधील ऑईलवर दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी डल्ला मारला. सदर बाब लाईनमनच्या माध्यमातून शिरपूर वीज वितरण कंपनीच्या अधीकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मात्र दीर्घ कालावधी लोटूनही ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑईल टाकून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. परिणामी पावसाचा खंड असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. म्हणून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी गोविंदा धानकी, विठ्ठल सुरपाम, यादव सूर, हरीभाऊ बांदूरकर, कवडू बलकी, संभाजी टेकाम, वामन भांदककर, चांगदेव बांदूरकर, दिलदार पठाण, तुकडोजी पिंपळशेंडे आदींनी केली आहे.