अमोल पानघाटे, साखरा (को): लगतच्या परिसरात मुंगोली, निर्गुडा, पैनगंगा आणि कोलगाव आदी कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. सदर खाणी मधून काढलेला कोळसा रेल्वे साईडिंगपर्यंत ट्रकद्वारे वाहून नेला जातो. परंतु ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक केल्या जाते. परिणामी नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
वणी तालुक्यातील साखरा कोलगाव परिसरात जुन्या नव्या कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. या खाणींमधून निघणारा कोळसा वणी, घुगूसच्या रेल्वे साईडिंगवर ट्रकद्वारे नेला जातो. कोळशाची वाहतूक करताना ट्रकवर ताडपत्री न झाकता नेला जातो. दरम्यान कोळशाचे कण हवेमध्ये मिसळतात.
कोळशाच्या बारीक कणांमुळे नागरिकांना डोळ्याच्या, श्वसनाच्या, त्वचेच्या आजारांना बळी पडावं लागत आहे. कोळशाची धूळ परिसरातील शेतपिकांवर पसरून पिकांच्या उत्पन्नात घट होत आहे. शिवाय सदर मार्गाने येजा करणाऱ्या दुचाकी स्वारांच्या डोळ्यात कोळशाची धूळ उडून अपघात घडण्याची शक्यता असते. म्हणून ट्रकवर ताडपत्री झाकून कोळसा वाहतूक करावी अशी नागरिकांची मागणी आहे.