शिरपूर पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त

वसुलीसाठी शिरपूर ठाण्यात 'खास' शिपायाची नेमणूक

0

जितेंद्र कोठारी, वणी: वरकमाईसाठी जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या शिरपूर पोलीस ठाण्यात वसुली यात स्पेशलायझेशन असेलल्या एका कर्मचा-याने चांगलेच ‘दिवे’ लावले आहेत. या ‘खास’ कर्मचा-याच्या वसुलीचा झोत हा मोठ्या ट्रान्स्पोर्टरकडे असतो. सततच्या वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त झाले आहेत. या संपूर्ण कार्यात वसुलीचा ‘दीपक’ उजळवणा-याला आता मोठ्या साहेबांनी त्यांचे ‘आर्म’ किती ‘स्ट्रॉन्ग’ आहे हे दाखविण्याची गरज आहे.  

चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, घुग्गुस, वणी, मोहदा येथून शिरपूर मार्गे कोळसा, सिमेंट, गिट्टी व रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. करंजी, वणी – घुग्गुस या राज्यमार्गावर शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव चौकी हे वाहतुकदारांकडून वसुली करण्याचे प्रमुख केंद्र बनले आहे. या सर्व व्यवहाराच्या सेटिंगसाठीच हा ‘खास’ कर्मचारी आहे.

कोळसा, सिमेंट व गिट्टीची वाहतूक करणारी तब्बल 72 ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून वसुली करण्याचे काम या खास शिपायाकडे सोपविण्यात आले आहे. शिरपूर ठाण्याच्या हद्दीतून निघणाऱ्या जड व ओव्हरलोड वाहनांकडून वसुलीसाठी मासिक रेटकार्ड ठरविण्यात आले आहे. प्रती ट्रक 500 रुपये तर ओव्हरलोड चालणाऱ्या प्रती ट्रक 1 हजार या प्रमाणे दोन ते अडीच लाख रुपयांची महिन्याकाठी वसुली या कर्मचाऱ्याकडून केली जात असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे हा खास शिपाई घुग्गुस, चंद्रपूर, गडचांदूर, राजुरा येथील ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऑफिसमध्ये स्वतः जाऊन वसुली आणत असल्याची माहिती आहे. वसुलीच्या दिवशी या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी बाबत डायरीमध्ये कोणतीही नोंद करण्यात येत नसल्याचीही माहिती आहे.

या वसुलीबाज पोलीस शिपायाने या पूर्वीही अनेक ‘दीपक’ लावले आहे. गाव व अंडे मिळाले की मजा असलेल्या या कर्मचा-याच्या ताब्यात असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र तात्कालीन पोलीस अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शिफारस करून या तरबेज कर्मचाऱ्याची नेमणूक परत शिरपूर ठाण्यात करवून घेतली.

मागील 12 वर्षांपासून वणी विभागातील मुकुटबन, वणी व शिरपूर ठाण्यात या शिपायाने ठाण मांडले आहे. नुकतेच मुकुटबन येथील ठाणेदारांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तातडीने कारवाई केली. असे अनेक प्रकरण तालुक्यात आहेत. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत होणा-या या वसुली रॅकेटवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा:

मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

Leave A Reply

Your email address will not be published.