स्व. गुलाबराव खुसपुरे स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड
नगर सेवा समिती व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
जितेंद्र कोठारी, वणी: येथील नगर सेवा समितीचे मार्गदर्शक व जैताई देवस्थान अन्नछत्र समितीचे अध्यक्ष स्व. गुलाबराव खुसपुरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगर सेवा समिती, स्माईल फाउंडेशन व मित्र परिवारातर्फे मंगळवार 13 जुलै रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातीचे 100 वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आले.
अभिवादनपर वृक्ष लागवड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनू महाराज तुगनायत व प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण अभ्यासक व ग्रीन प्लॅनेट सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर सेवा समितीचे संस्थापक दिलीप कोरपेनवार यांनी केले. पर्यावरणविद व केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी सृष्टीतील प्रत्येक सजीवांचे मानवी जीवनावर परस्पर पुरकता व महत्वाबाबत सोप्या भाषेत समजवून सांगितले.
मनू महाराज यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना स्व. गुलाबराव खुसपुरे यांचे सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व पर्यावरण विषयी कामाची ओळख उपस्थिताना करून दिली. यावेळी राजू पिंपळकर, सुधीर बलकी, राजेश खुसपुरे, अरुण कावडकर, वर्षा खुसपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप कोरपेनवार यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू पिंपळकर यांनी मानले. वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष कोंडावार, सागर जाधव, स्माईल फाउंडेशनची संपूर्ण टीम तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.