बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील बोटोनीजवळ आज शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण ट्रक जळून खाक झाला तसेच ट्रकमध्ये ठेवलेल्या संपूर्ण सोयाबिनाचा कोळसा झाला. दरम्यान ट्रक जळाल्याची वार्ता पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
सोयाबीन भरलेला एक ट्रक यवतमाळहून वणीच्या दिशेने निघाला होता. सकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान ट्रकमधून अचानक धुर निघताना चालकाला दिसला. त्यामुळे चालक ट्रकच्या बाहेर आला. काही क्षणातच ट्रकमधून आगीचे लोट येण्यास सुरुवात झाली. ट्रकला आग लागल्याचे आढळताच येथे बघ्यांची एकच गर्दी झाली. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वणी तसेच पांढरकवड्याहून आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी गेली.
ही आग इतकी भीषण होती की वणी येथील फायर ब्रिगेडला दोन फे-या मारव्या लागल्या. स. 10 वाजेपर्यंतही आग धुमसत होती. आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कळताच मारेगाव येथील पोलीस दल आणि करंजी येथील वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. फायर फायटर दीपक वाघमारे, रितेश गौतम, वाहनचालक देविदास जाधव इत्यादींनी आग आटोक्यात आणली.



Comments are closed.