गाय चोरीच्या संशयावरून खरबडा परिसरात दोन गटात राडा

2 अल्पवयीन मुलांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : गाय चोरून नेत असल्याच्या संशयावरून शहरातील खरबडा भागात दोन गटात राडा झाला. मंगळवार 13 सप्टें. रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेबाबत दोन्ही गटाद्वारे परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांसह (अल्पवयीन) 11 जणांवर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तुळशीराम उर्फ तुषार भगवानराव काकडे (28), रा. हनुमान मंदिर जवळ, गोकुळ नगर वणी यांच्या तक्रारीनुसार, तुळशीराम हा दुग्ध व्यवसाय करीत असून त्याच्याकडे 6 गाई व 40 म्हशी आहे. मंगळवारी दिनांक 13 सप्टें. रोजी तो दूध विक्री करून परत घरी जात होता. दरम्यान रात्री 9.30 वाजता अंदाजे 15 वर्षाचे 2 मुलं त्यांची लाल रंगाची गाय किंमत 25 हजार रुपये ही हाकलून नेताना आढळून आले. त्याने दोघांना थांबून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की खरबडा मोहल्ला येथील अरबाज खान, अश्फाक खान व आसिफ खां उर्फ माटो यांनी गाई आणण्यास सांगितले तसेच ते त्यांना प्रत्येकी 200 रुपये देणार असल्याचेही सांगितले. 

दरम्यान दोन्ही मुलांना विचारपूस करीत असताना 3 इसम हातात लाठ्याकाठ्या घेऊन तुळशीराम यास मारण्यासाठी आले. मात्र ओरडल्यामुळे जत्रा मैदान परिसरातील 10-15 जण तुळशीरामच्या मदतीला धावून आले. त्यामुळे दोन्ही मुलासह सर्व हल्लेखोर पळून गेले. तुळशीराम काकडेच्या फिर्याद वरून अरबाज अलिफ खान, अशपाक खान साहेब खान पठाण व आसिफ खां उर्फ माटो हुरमत खान व 2 विधिसंघर्ष बालकांवर कलम 143, 147, 379, 504, 506, 511 भादंवि व कलम 135 मपोअ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार शेख इस्माईल शेख अब्दुल (32), रा. खरबडा मोहल्ला वणी याच्या तक्रारीनुसार, दि.13 सप्टें. रोजी रात्री 9.30 वाजता दरम्यान आई व दोन बहिणीसह तो घराबाहेर बसून होता. त्यावेळी समोरून काही इसम दुचाकीवर तर काही पळत येताना दिसले. त्यामुळे सर्वजण घरामध्ये गेले व घराचे दार बंद केले. दुचाकी व पायी आलेले इसमांनी घराजवळ येऊन शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केली. त्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या.

शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तुळशीराम भगवान काकडे (27), सतिश शंकर वाघाडकर (21), सुनील पंजाबराव वायकर (22), गणेश किसन साळुंके (22) सर्व रा. गोकुळनगर तसेच सागर गुलाब रासेकर (31) व ओमप्रकाश उर्फ सोनू बबन नरड (30) रा. पटवारी कॉलोनी वणी विरुद्ध कलम 143, 147, 323, 336, 504, 506 भादंवि व कलम 135 मपोअ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: 

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू

Comments are closed.