धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….
वणीतील दोन व्यक्ती पॉजिटिव्ह, नागपूर येथे उपचार सुरू...
जब्बार चीनी, वणी: अखेर वणीमध्ये दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कालपासून याबाबत विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र प्रशासनाने अधिकृतरित्या दोन पॉजिटिव्ह रुग्ण आढल्याचे जाहीर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पॉजिटिव्ह रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती असून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आणि शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 जून रोजी मुंबईहून एक कुटुंब वणीत आले. त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणं आढळून आल्याने त्यातील दोन व्यक्ती तपासणीकरीता नागपूरमध्ये गेले. तिथे त्यांचा कोरोनाबाबतचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. रिपोर्ट पॉजिटिव्ह येताच त्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार संध्याकाळच्या सुमारास वरोरा रोड, महाविर भवन परिसरात त्या घरासमोर अचानक प्रशासनाच्या गाड्या उभ्या आल्याची माहिती शहरात पसरली. प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचल्याची माहिती मिळतातच लोकांनीही तिथे गर्दी केली. दरम्यान आरोग्य सेतू ऍपमध्ये आधी एक व नंतर दोन पॉजिटिव्ह रुग्ण दाखवत असल्याने चर्चेला आणखीनच उधाण आले होते.
संपर्कात आलेल्यांचा घेतला जाणार शोध
या घटनेमुळे प्रशासन हादरले आहे. दरम्यान या व्यक्तीचे कुटुंबीय तसेच या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या व्यक्ती आल्या त्यांचा युद्धपातळीवर शोध घेणे सुरू आहे. तसेच ते लोक ज्या परिसरात राहतात तो परिसरही सिल केला जाणार असल्याची माहिती आहे.
वणीमध्ये एकच खळबळ
कालपासून वणीमध्ये विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र आता कोरोना पॉजिटिव्ह मिळाल्याने संपूर्ण वणी परिसर हादरून गेला आहे. वणीत अद्याप कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने सर्वसामान्य नागरिकही निश्चिंत फिरत होते. शासनाने दिलेल्या सूचनांनाही हरताळ फासला जात होता. मात्र आता अधिकृतरित्या कोरोना पेशन्ट सापडल्याने प्रशासनातर्फे मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी केली जाऊ शकते.