…. जेव्हा चिखलगावच्या शाळेत मुलं पळवायला शिरतात दोन अज्ञात !

वणी शहरात वेगाने पसरत आहे मुलं पळवणा-या टोळीची अफवा

जितेंद्र कोठारी, वणी: प्रसंग एक: दुपारच्या सुमारास चौकातील पानटपरीवर काहीं लोकांच्या गप्पा सुरू आहे. त्याती एक किस्सा… चिखलगावमधल्या एका शाळेत दोन अज्ञात शिरले. ते दोघेही दोन मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवतात. चॉकलेट बघून त्यांच्याजवळ दोन चिमुकले विद्यार्थी येतात. जवळ येतात ते दोघे पोत्यामध्ये मुलांना जबरदस्तीने टाकतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुलांचा आरडाओरड झाल्याने परिसरातील लोक धावून जातात. दोघांना चांगली धुलाई होते. लोक पोलिसांना बोलावतात व पोलीस त्या दोन्ही मुलं पळवणा-या व्यक्तींना घेऊन जातात.

किस्सा क्रमांक 2: व्हॉट्स ऍपवर एक फोटो येतो. दोन महिलांचा तो फोटो असतो. त्यात लिहिले असते की या दोघी शहरात आल्या असून त्या एकटे दुकटे मुलं पळवून नेत आहेत. त्यामुळे सावध राहा किंवा या दोघी जर आढळल्यास त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करा. सध्या अशा एक, दोन नव्हे तर अफवांचा अख्खा बाजार शहरात भरला आहे. जो तो आपापल्या परीने मुलं पळवणा-या टोळीचे किस्से सांगत आहे.

सध्या अख्या महाराष्ट्रात मुलं पळवणा-या टोळीच्या अफवेने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात पसरलेल्या या अफवेने दोन दिवसांआधी वणीत देखील शिरकाव केला असून त्याने पालकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. पालक मुलांना शाळेत, ट्युशनला पाठवण्यासाठी कचरताना दिसत आहे. अफवेसह आता सोशल मीडियावर वणीमध्ये टोळी आल्याचे मॅसेज आणि फोटो फिरत असल्याने या अफवांना चांगलेच बळ मिळत आहे.

नेमके मॅसेज काय आहेत?
सध्या अमुक परिसरात टोळी आली आहे. कुणी भीक मागतात. कुणी ब्लँकेट विकतात अशा अफवा संपूर्ण शहरात सुरू आहे. तर सोशल मीडियावर एका फोटोमध्ये दोन महिला दिसत असून त्या मुलं पळवतात अशा आषयाचा मॅसेज त्यावर लिहिलेला आहे. तर दुसरा चांगलाच व्हायरल होणारा फोटो हा इराणी आणि कलबुर्गी गँगचा फोटो आहे. त्यात काही लोकांचे फोटो असून ते ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने येऊन मुलं पळवतात असा मॅसेज त्यावर लिहिलेला आहे.

 

फॅक्ट चेक: वणी बहुगुणीने चिखलगाव येथील घटनांबाबत तसेच उपविभागात कुठे अशा घटना घडल्याबाबत विचारणा केली असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. तर इराणी व कलबुर्गी गँगचा फोटो हा कर्नाटकमधला असून तो तीन ते चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यातील फोटो हे गुंडगीरीसाठी कर्नाटक पोलिसांनी व्हायरल केले होते. तर दोन महिलांचे फोटो हे फेक आहे.

कुठून झाली अफवेला सुरुवात ?
गेल्या 10 दिवसांपासून मुलं पळवणा-या टोळीची अफवा महाराष्ट्रात पसरत आहे. यास कारणीभूत सोशल मीडियावरील एक पोस्ट होती. यात मुंबई इथे ही टोळी आल्याचा उल्लेख होता. इथून पुढे कल्याण, ठाणे, नाशिक राज्यभरात ही पोस्ट व्हायरल झाली. पुढे ही पोस्ट स्थानिक गावांच्या नावाने व्हायरल व्हायला सुरूवात झाली. त्यातच यूपी येथील एका तरुणाला मारहाणीचा व्हिडीओ हा मुलं पळवणा-या टोळीला पकडून स्थानिकांनी मारले, अशा खोट्या संदेशासह व्हायरल झाला. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातच या अफवेचे लोण पसरले. दुर्दैवी बाब म्हणजे सांगली येथे गेल्या आठवड्यात चार साधुंना मुलं पळविण्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली.

पालकांची सातत्याने विचारणा – सागर जाधव, शिक्षक
गेल्या चार पाच दिवसांपासून काही पालक भीतीपोटी याबाबत कॉल करून विचारणा करत आहे. मात्र ही अफवा असल्याचे समजावून सांगितल्यानंतर ते निश्चिंत झाले आहे. जेव्हा जेव्हा पालकांच्या कानावर अशा अफवा येतात तेव्हा तेव्हा त्यांचा याबाबत कॉल येतो. मात्र त्यांच्या योग्य प्रकारे समजावून सांगितले जाते.
– सागर जाधव, संचालक जाधव कोचिंग क्लास

अशी कोणतीही घटना घडलेली नाही – संजय पुज्जलवार
मुलं पळवण्याचा प्रयत्न झाल्याची कोणतीही घटना आपल्या उपविभागात झाली नाही. त्यामुळे मुलं पळवणा-या टोळीबाबत जे काही व्हायरल होत आहे. ते सर्व अफवा आहे. त्यामुळे कुणीही यावर विश्वास ठेवू नये. तसेच भीतीपोटी कुणीही कायदा हातात घेऊ नये.
– संजय पुज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी

हे देखील वाचा: 

सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ

 

Comments are closed.