मार्डी-खैरी रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार तर एक गंभीर

वणीहून गाडी पाहून परतणा-या मित्रांचा अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: वणीत गाडी बघून गावी परतत असताना एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. मार्डी ते खैरी रोडवर संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा सहकारी जखमी झाला. दुर्गेश बंडुजी धोटे (27) राहणार भिवापूर ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा असे मृतकाचे नाव असून त्याचा मित्र राजू श्रीराम सराटे (28) रा. भिवापूर हा गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की मृतक दुर्गेश हा त्याचा मित्र राजूसह शनिवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी भिवापूर येथून स्प्लेंडर (MH32 W 9975) या दुचाकीने वणी येथे गाडी बघण्यासाठी आला होता. गाडी बघितल्यानंतर ते दोघेही वणीहून परत निघाले. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास मार्डी ते खैरी रोडवर दापोरा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागल्याने दुर्गेश जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र राजू हा गंभीर जखमी झाला.

अपघात होताच घटनास्थळी लोक गोळा झाले. त्यांनी मृतक दुर्गेशला ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर एका क्रुझर वाहनाने जखमी राजूला वडनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अज्ञात वाहनाचा चालक धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून गाडी घेऊन पसार झाला. मृतकाच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

शनिवार दिवस ठरला अपघाताचा
शनिवारी मारेगाव तालुक्यात दोन अपघात झाले. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. दोपारा येथील अपघातासह दुसरा अपघात हा मारेगाव येथील वणी रोडवर झाला. एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाल्याने तालुका हादरला आहे.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.