खरा शिवसैनिक मर्द मावळा; नव्हे उडणारा कावळा !!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची वणीत डरकाळी
अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: ज्याचे व्रत ‘निष्ठा आणि इमान’ आहे आणि जो शिवसेना पक्षाशी कधीही गद्दारी करीत नाही तो खरा शिवसैनिक मावळा असतो. तर या उलट निष्ठा विकणारे मावळे हे खरे शिवसैनिक कधीच नसतात, तर ते असतात ‘उडणारे कावळे’. अशी घणाघाती आणि बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे उमेदवार बाळूभाऊ धानोरकर यांचे नाव न घेता केली.
ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सेना, भाजप महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ सोमवार 8 एप्रिल रोजी वणी येथे आयोजित प्रचंड गर्दी असलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेनेचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत, विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर, माजी आमदार तथा शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, उद्धव ठाकरे यांचे स्विय सहायक मिलिंद नार्वेकर आणि सेना व भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेतील जल्लोषपूर्ण वातावरणामुळे अधिकच उल्हसित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी देश पवित्र आणि सुरक्षीत हातात राहावा आणि देशाची सुत्रे रक्ताळलेल्या हातात जाऊ नये म्हणून आपण भाजपशी युती केल्याचे स्पष्ट केले. आपला पक्ष केंद्र व राज्यात भाजपचा सहकारी पक्ष असला तरीही आपण शेतक-यांच्या न्याय प्रश्नांवर सरकारशी लढलो आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असेही प्रशस्तीपत्र त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले.
सेना व भाजप प्रणीत सरकार हे खरे बोलणारे सरकार असून आपण शेतक-यांची कास कधीही सोडली नाही आणि भविष्यात सोडणारही नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. संपूर्ण देशात शिवसेना शेतक-यांच्या प्रश्नांविषयी सातत्याने लढत होती तेव्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष काय करत होते? असा खडा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काँग्रेसने अडवाणींची फिकीर करू नये
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने भाजपने लालकृष्ण अडवाणींना अपमानास्पद वागणूक दिली याचा घोषा लावत आहे; परंतु काँग्रेसला हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही. कारण काँग्रेसने आपल्या सत्ता काळात देशातील शेतक-यांना कशी वागणूक दिली हे आधी तपासून पाहावे. असा ही टोला त्यांनी राहुल गांधींवर टीका करताना लावला. काँग्रेसच्या ‘लाज कशी वाटत नाही?’ या इलेक्शन कॅम्पेनची खिल्ली उडवताना ते म्हणाले की शेतक-यांना अपमानास्पद वागणूक देणा-या काँग्रेसलाच अधिक लाज वाटायला पाहिजे.
दिनेश घुगुल व गोवारींच्या हत्याकांडाने रक्ताळले काँग्रेसचे हात
काँग्रेसच्या काळात 8 डिसेंबर 2006 रोजी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतक-यांवर अमाणूष गोळीबार झाला होता. या गोळीबारात मेंढोलीचा दिनेश घुगुल या गरीब शेतक-याचा बळी गेला होता. याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी काढली. त्यावेळी उपस्थित जनसमुदाय जुन्या आठवणींने सुन्न झाला. दिनेश घुगुल व निरपराध शंभरच्या वर निशस्त्र गोवारींवर गोळ्या चालवणा-या काँग्रेसचा हात जनसामान्य व शेतक-यांच्या रक्ताने माखलेला आहे, अशी जहरी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.