अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत अशुद्ध पाणी
तक्रार केल्यास घरी पाठवण्याची मुख्याधिपेकेची धमकी
वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी मिळत आहे. धक्कादायक म्हणजे यासंबंधी तक्रार केली तर शाळेतून घरी पाठविण्याची धमकी मुख्याध्यापिकेने दिली असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी उपयुक्तांकडे केली आहे.
वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या परसोडा येथे अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आली होती. मागील काळात येथे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. परिणामी या शाळेत पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र बोअरवेलचे पाणी शुद्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्ती करण्यासाठी वर्गणी गोळा करून मुख्याध्यापिकेकडे दिली. परंतु मुख्याध्यापिकेने जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्ती केले नाही.
अशुद्ध पाणी असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या कुरबुरी वाढल्या. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार विचारणा केली असता मुख्याध्यापिकेने याकडे दुर्लक्ष केले. या विषयी तक्रार केली तर तुम्हाला दाखला देऊन शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी उपयुक्तांकडे केली आहे.
गेल्या एक महिन्यापासून जलशुद्धीकरण यंत्र बंद अवस्थेत आहे मात्र याकडे मुख्याध्यापिका दुर्लक्ष करीत आहे. समजा दूषित पाणी पिऊन काही झाल्यास मुख्याध्यापिका जबाबदार राहील असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 17 विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून प्रशासनाकडे तक्रार केली आहे. एकूणच शासनाचा निधी येत असताना विद्यार्थ्यांना वर्गणी गोळा करायला लावून साहित्य खरेदी अथवा दुरुस्ती करण्याचे काम सुरू झाले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.