मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू

आईचा विजय साजरा करण्यासाठी पेढे आणताना काळाचा घाला

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीवर गावाकडे जात असताना मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. झरीजामणी तालुक्यातील मुकूटबन ते येडशी मार्गावर सोमवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. भोला महादेव नगराळे (40) रा. येडशी ता. झरी असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक येडशी ग्रामपंचायतचा उपसरपंच असल्याची माहिती आहे.

आणि विजयी जल्लोष ठरला औट घटकेचा

झरी तालुक्यातील अडेगाव येथील ग्राम विकास सहकारी संस्थेची निवडणूक रविवार 24 एप्रिल रोजी संपन्न झाली. या निवडणुकीत येडशी ग्रामपंचायतचे उपसरपंच भोला नगराळे यांची आई विजयी झाली होती. विजयी जल्लोष साजरा केल्यानंतर सोमवारी सकाळी भोला नगराळे पेढे आणण्यासाठी मुकूटबन येथे गेला. पेढे घेऊन दुचाकीने परत येत असताना मुकुटबन रेल्वे स्टेशन जवळ चिंचेच्या झाडाखाली हजारों मधमाशांनी भोळा नगराळेवर हल्ला चढविला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आई विजयी झाल्याचा जल्लोष भोळा नगराळेसाठी औट घटकेचा ठरला.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक मंगेश पाचभाई व इतर लोकांनी लगेच भोळा नगराळेला मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला वणी येथील खाजगी रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला. वणी ग्रामीण रुग्णालयात भोळा नगराळे यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करून रात्री 8 वाजता येडशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा-

मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला

Comments are closed.