पीडित शेतकरी कुटुंबाला मिळाली अपघात विम्याची रक्कम

दिलीप भोयर यांच्या प्रयत्नाला यश

जितेंद्र कोठारी,वणी : रस्ते अपघातात एकुलता एक मुलगा गमावलेल्या पीडित शेतकरी कुटुंबाला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या प्रयत्नाने नुकतेच नेरड येथील शेतकरी गंगाधर सोनपित्रे यांचे बँक खात्यात विमा रक्कम जमा झाली आहे.

तालुक्यातील नेरड येथील गंगाधर सोनपित्रे यांचा एकुलता एक मुलगा संकेत सोनपित्रे (26) याचा ऑगस्ट 2021 मध्ये वणी मुकुटबन मार्गावरील काकडे यांचे शेताजवळ अपघात झाला होता. या दुर्घटनेत संकेतचे दुःखद निधन झाले होते. एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे सोनपित्रे दाम्पत्याचा म्हतारपणी जगण्याचा आधार हरविला गेला.

मुलगा गेल्याने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबियांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी दिलीप भोयर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करुन तालुका कृषी कार्यालयात जमा केले. तसेच सतत पाठपुरावा करुन सोनपित्तरे कुटुंबियांना 2 लाखाची मदत मिळवून दिली. पीडित कुटुंबाला विमा योजनेचा लाभ मिळणेकरिता तालुका कृषी अधिकारी सुशांत माने व विमा सहाय्यक अधिकारी ललित कलिंदे यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed.