विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित

मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी 6 एप्रिलला सायंकाळी होईल सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील जैताई देवस्थानाच्या वतीने पूज्य मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी नानासाहेब शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना गौरविण्यात येत आहे. शनिवार दिनांक 6 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठविधिज्ञ अरुण खानझोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत असणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने. भगवान श्री गणेश, जगद्गुरु आदि शंकराचार्य आणि संस्कृत साहित्य हे तीन अभ्यासाचे, आनंदाचे विषय. ग्रंथलेखन, वृत्तपत्रे लेखमालिका आणि व्याख्यान-प्रवचने ही तीन अभिव्यक्तीची साधने, तिन्ही विषयांवर तिन्ही माध्यमे असली तरी श्री गणेश विषयक ग्रंथमालिकेसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये, श्री शंकराचार्यांच्या स्तोत्रांवरील वृत्तपत्रीय लेख मालिकेसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणि गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल वरील संस्कृत साहित्य रसास्वादासाठी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन विक्रम नोंदवणारे त्रि-विक्रम म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड.

वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळावर सलग तीन वेळा निर्विरोध निवड, कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या स्वानंद पुंड यांच्या कार्याची ७१ प्रकाशित ग्रंथ, ६ संपादित ग्रंथ, 16 इ बुक, विविध वृत्तपत्रातून 40 वर लेख मालिकांमधून 4००० वर लेख, विविध दूरचित्रवाहिन्या आणि आकाशवाणीवर शेकडो प्रसारणे, विविध धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक संस्थांमधून 3००० वर व्याख्यान-प्रवचने, मोरया जीवनगौरव, जिजामाता विद्वत गौरव, धर्मभूषण, राजरत्न, प्रबोधन प्रवचनकार, ब्रह्मगौरव असे एकाहून एक 3० पेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार ही सूची कोणालाही थक्क करणारीच आहे. भारतीय ऋषी परंपरेवर त्यांनी लिहिलेली पहिली लेख मालिका आणि त्याचे प्रकाशित झालेले पुत्र भारतीचे हे पहिले पुस्तक या स्वरूपात या ज्ञानप्रचारगंगेची गंगोत्री दैनिक तरुण भारत आहे हे विशेष उल्लेखनीय. डॉ . स्वानंद पुंड यांनी दैनिक तरुण भारतात लिहिलेल्या ऋषिस्मरण, प्रभात चिंतन, चातुर्मास नवनीत, सुभाषितमाला, चमत्कारिक संस्कृत, नीतिशतकम् , मेघदूतम् , शतश्लोकी या सर्वच लेखमालिका वाचकांच्या कायम स्मरणात आहेत.

संस्कृत आणि संस्कृतीच्या प्रचार प्रसार कार्यात त्यांच्या प्रयासांना विविध पीठाधीश्वर शंकराचार्य महाराजांसह अनेक मान्यवरांनी गौरविले असणे हे त्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने गाणपत्य संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आलेले आमंत्रण आणि न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांनी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भारत वर्षातील ७५ मान्यवरांच्या सत्कारात मिळालेले स्थान या कार्याच्या महत्तेचा वैशिष्ट्यपूर्ण गौरव आहे. संस्कृत साहित्याच्या रसास्वाद क्षेत्रात त्यांनी घडविलेली क्रांती म्हणजे गीर्वाण वाणी. लॉकडाऊन च्या काळात प्रथम स्वतःच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, नंतर सर्वच विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी आणि शेवटी सर्वच संस्कृत आणि संस्कृती प्रेमी जनांसाठी पुढील शंभर वर्ष उपयोगी ठरेल असा अद्भुत खजिना म्हणजे गीर्वाण वाणी. नीतिशतकम् , मेघदूतम् , अभिज्ञान शाकुंतलम् , स्वप्नवासवदत्तम् , वेदांतसार अशा एकाहून एक श्रेष्ठ ग्रंथांवर आधारित ४५० वर व्हिडिओ आणि प्रत्येक मालिकेला अक्षरशः जगभरातून मिळत असलेला हजारो संस्कृत प्रेमींचा प्रतिसाद हे या क्षेत्रातील नवीन आश्चर्य आहे.

यातील नीतीशतकम् निरूपण मालिका आजवर जगभरात १५००० वर संस्कृत प्रेमी पर्यंत पोहोचली असून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आणि पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे यावर आधारित अभ्यासक्रमांना मान्यता प्राप्त झाली आहे यातूनच त्याच्या शास्त्रशुद्धतेची खात्री पटावी. याच स्वरूपात तयार केलेल्या त्यांच्या श्री गणेश अथर्वशीर्ष विषयावरील निरूपण मालिकेला आजपर्यंत ३०००० वर गणेशप्रेमींचा प्रतिसाद लाभलेला आहे.

प्राचीनतम भारतीय ज्ञानसंग्रहाला अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सादर केल्यामुळे वैश्विक पातळीवरील अध्यापक ठरलेल्या विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड यांना वणी येथील जैताई देवस्थानच्या वतीने आज प्रदान करण्यात येत असलेला नानासाहेब शेवाळकर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार हा खरोखरच त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे. ” पिकते तेथे विकत नाही” ही लोकोक्ती असत्य ठरवणाऱ्या वणीकरांच्या गुणग्राहकतेचे आणि ज्यांच्या साहित्यिक आणि वाङ्ग्मयीन पंथाचा वारकरी होण्याचा कायमच प्रयत्न केला त्या गुरुवर्य प्राचार्य राम शेवाळकर यांच्या नावाने विभूषित पुरस्कार प्राप्त होत असल्याने विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या पुढील प्रत्येक वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभकामना.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.