बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर वाचनालय व राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून वाचनप्रेरणादिन दि.15 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त नगर वाचनालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर वाचनालयात दि.15 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता येथील सभागृहात वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत किमान 50 विद्यार्थी या ठिकाणी सतत 3 तास पुस्तकांचे वाचन करून ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. प्रसाद खानझोडे यांचे ” वाचन संस्कृती” या विषयावर वाचनालयाच्या सभागृहात रात्री ७ वा. व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी वाचनालयातील उत्कॄष्ठ वाचकाचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव गजानन कासावार यांनी केले आहे.