ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4

विजूभाऊ मुकेवार बनले वामनरावांचे पक्के विरोधक, आयाराम गयाराम नगरसेवकांची चांदी

जब्बार चीनी, वणी:  1992 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शामराव ठाकरे यांचे हत्याकांडात नाव आले व ते पदमुक्त झाले. त्यानंतर उपाध्यक्ष पी के टोंगे यांनी नगराध्यक्षाचा प्रभार स्वीकारला. याबाबत सविस्तर आपण गेल्या भागात पाहिले. 2.5 वर्षांनंतर पुन्हा नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते. एक गट बहुमतात होता. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी हे गणित अचानक बदललं व बहुमतातील गटातील संख्याबळ कमी झालं व विरोधी गट बहुमतात आला. आता विरोधी गटाचा अध्यक्ष होणार हे निश्चित होतं. मात्र कहाणी अभी बाकी है…. मतदानाच्या एक दिवस आधी अशा काही घडामोडी घडल्या की सर्व राजकीय गणितच बदलून गेलं आणि नगराध्यक्षपदासाठी कुठेही शर्यतीत नसणारे संजय देरकर हे ‘ऍक्सिडेंटल’ नगराध्यक्ष झाले. हा संपूर्ण घटनाक्रम प्रचंड रंजक आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काही नगरसेवकांनी चांगलेच हात साफ करून घेतले. आज ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेच्या चौथ्या भागात आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

1991 च्या नगपालिकेच्या निवडणुकीत विजूभाऊ मुकेवार, ओमप्रकाश चचडा व आमदार बापुराव पानघाटे यांचे असे तीन पॅनल उभे होते. तर 35 वार्ड होते. बापूराव पानघाटे गटाचे उमेदवार नंतर मुकेवार आणि चचडा गटामध्ये विभागले गेले. 2.5 वर्षांनंतर म्हणजे 1994 साली नगराध्यक्षासाठी पुन्हा मतदान होणार होते. त्यावेळी दोनच गट शर्यतीत होते. मुकेवार गटाकडे 20 सदस्य होते. तर चचडा गटाकडे 15 सदस्य होते. मात्र सदस्य कमी असूनही ओमप्रकाश चचडा यांनी मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष बनायचं असा चंग बांधला. साम, दाम, दंड भेद निती वापरत त्यांनी रणनिती आखली.

चचडा यांनी पहिला डाव हा मुकेवार यांचे पॅनल फोडण्यासाठी टाकला. त्यावेळी मुकेवार हे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांच्या सोबत होते. मात्र राजकीय बॉम्ब टाकत चचडा यांनी चक्क वामनरावांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे प्रदीप बोनगीरवार व त्यांचे सहकारी गणपत सहारे यांना आपल्या गटात ओढले. हा सर्वांसाठीच धक्का होता. यामुळे खळबळ उडणे सहाजिकच होती. मात्र तेव्हाही मुकेवार यांचा गट बहुमतातच होता. दोन सदस्य गेल्यानंतरही मुकेवार गटाकडे 18 नगरसेवक होते व चचडा गटाकडे 17 नगरसेवक होते.

दोन सदस्य ओढल्यानंतर आता ओमप्रकाश चचडा यांना नगराध्यक्ष बनण्यासाठी अवघ्या एका नगरसेवकाची गरज होती. प्रदीप बोनगिरवार हे गटात आल्यानंतर चचडा यांनी मुकेवार गटाच्या इरफाना बेगम या नगरसेविकेला आपल्या गटात ओढले. आता संख्याबळ उलटे झाले. मुकेवार गट अल्पमतात आला. त्यांच्याकडे 17 नगरसेवक तर चचडा गटाकडे 18 नगरसेवक झाले. आता ओमप्रकाश चचडा हे नगराध्यक्ष बनणार याची केवळ औपचारिकता बाकी होती. बहुमत मिळाल्याने ओमप्रकाश चचडा हे निश्चिंत झाले व ते सहकारी सदस्यांना घेऊन देवदर्शन/पर्यटनाला गेले.

मुकेवार गटाचा तोंडचा घास चचडा यांनी हिसकवला होता. मात्र मुकेवार हे देखील मुसद्दी आणि मुरलेले राजकारणी होते. त्यांनी त्यापेक्षा मोठा डाव फेकला. त्यांनी थेट संजय देरकर यांच्यासमोर एक जबरदस्त ऑफर ठेवली. जर ते एका सदस्याला सोबत घेऊन त्यांच्या गटात आले तर त्यांना नगराध्यक्ष केलं जाईल ! एक सदस्य सोबत आणण्याची अट यासाठीच होती कारण आणखी एखादा सदस्य फुटला तर परत खेळ बिघडायला नको. मुकेवारांची ऑफरच जंबो होती. कारण तो पर्यंत देरकर हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत कुठेही नव्हते. थेट नगराध्यक्ष पदाची ऑफर आल्याने संजय देरकर यांनी संधीचे सोने करायचे ठरवले व त्यांनी तात्काळ गट बदलवला. देरकर त्यांचे जवळचे सहकारी विठ्ठल होले यांना सोबत घेऊन मुकेवार गटात गेले. आता संख्याबळ पुन्हा बदलले. 18 संख्याबळ असलेल्या चचडा गटाकडे आता 16 नगरसेवक होते. तर मुकेवार गटाकडे आता 19 सदस्य झाले.

संजय देरकर बनले ऍक्सिडेन्टल नगराध्यक्ष
संजय देरकर यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यापीठाच्या निवडणुकांमधून झाली होती. त्यांच्या नेतृत्वात ग्रामीण पॅनलने कॉलेज निवडणूक गाजवली होती. मात्र त्यांना हवी तशी संधी मिळाली नव्हती. ते ज्या गटात होते तिथे नगराध्यक्षपदासाठी चचडा यांचे नाव होते. मात्र अशा काही घडामोडी घडल्या की अचानक कुठेही शर्यतीत नसणारे संजय देरकर यांच्या गळ्या नगराध्यक्ष पदाची माळ पडली व ते ऍन ऍक्सिडेन्टल नगराध्यक्ष झाले. ते वणी नगरपालिकेचे 26 वे नगराध्यक्ष होते. 2 वर्ष संजय देरकर यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. 

विजूभाऊ मुकेवार बनले वामनरावांचे पक्के विरोधक
विजूभाऊ मुकेवार हे वामनराव कासावार यांचे पक्के समर्थक होते. मात्र वामनराव त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले प्रदीप बोनगिरवार हे चचडा यांच्या गटात गेले. यामागे वामनराव कासावार यांचाच हात होता अशी कुजबुज तेव्हा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली होती. कदाचित याच कारणामुळे पुढे निवडणुकीत मुकेवार हे वामनराव कासावार यांच्या कायम विरोधात राहिले. मुकेवार यांचा विरोध इतका टोकाचा होता की असे म्हणतात की कासावार यांची आमदारकीची टर्म संपत आल्यानंतर तिकीट मागण्यासाठी जाण्यासाठी त्यांच्याकडे अनुभवी लोक देखील उरले नव्हते. अखेर शहरात ”बीजेपी” नावाने प्रसिद्ध असलेल्या त्रिकुटांनी ही धुरा सांभाळली.

आयाराम गयाराम नगरसेवकांची चांदी
1991 चे पहिले नगराध्यक्षपदाची निवडणूक होती की ज्यात पहिल्यांदाच घोडेबाजाराला सुरुवात झाली. हाच कित्ता अडीज वर्षांनंतरच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत कायम राहिला. इतकंच काय तर नगराध्यक्षांची निवडणूक संपल्यानंतर विषय समितीच्या निवडीतही हा प्रकार दिसून आला. दोन्ही गटात चांगलीच होड दिसून आली. यात आयाराम गयाराम नगरसेवकांनी चांगलाच हात साफ करून घेतला. एक नगरसेवक सकाळी एका गटात राहायचा तर संध्याकाळी दुस-या गटात राहायचा. दुस-या दिवशी सकाळी त्या नगरसेवकाची पुन्हा घरवापसी झाली असायची. अशी चढाओढ दोन्ही गटात असायची. अशा अनेक आयाराम गयाराम नगरसेवकांची तेव्हा चांगलीच चांदी झाली.

देरकरांचा राजकीय नेतृत्व म्हणून उदय
नगराध्यक्ष बनल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेतृत्व म्हणून संजय देरकरांचा उदय झाला. पुढे त्यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या अनेक निवडणूक लढवल्या गेल्या. त्यांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादीची सत्ता देखील आली व दोनदा नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. यात त्यांना यश  आले नाही, पण गेल्या विधानसभेत त्यांनी अपक्ष राहूनही चांगले मतदान घेतले होते.

क्रमश:

(नगरपालिका निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी आणि डावपेच पुढील भागात. त्यामुळे वारे नगर पालिकेचे ही सिरीज वाचण्यास विसरू नका…)

आपण जर वारे नगरपालिकेचे या सिरिजचा तिसरा भाग वाचला नसल्यास खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.:

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3

वणी बहुगुणीच्या सर्व अपडेट साठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज तसेच गृप जॉईन करा…

पेज लिंक – https://www.facebook.com/wanibahuguni/

गृप लिंक – https://www.facebook.com/groups/241871233000964/

Comments are closed.