आजी माजी आमदारांच्या गावात जय सहकारचे जोरदार शक्ती प्रदर्शन
पाटण, मुकुटबन, लिंगटी, कायर येथे जय सहकार पॅनलची रॅली.... संस्था कुणाच्या हाती सुरक्षित याची मतदारांना जाण - ऍड काळे
जितेंद्र कोठारी, वणी: वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उडी घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्त्वात लढणा-या जय सहकार पॅनलतर्फे शुक्रवारी झरी तालुक्यात प्रचार दौरा काढण्यात आला. कायर, मुकुटबन सह माजी आमदार वामनराव कासावार यांच्या पाटण व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी या गावात जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वसंत जिनिंगच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असल्याने सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी जय सहकार पॅनलतर्फे झरी तालुक्याचा दौरा करण्यात आला. विविध गावांचा दौरा करीत उमेदवारांनी मतदारांची भेट घेतली. त्यांना ऍड काळे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती देण्यात आली. तसेच भविष्यातील विविध योजनांची देखील माहिती देण्यात आली. जय सहकार पॅनलतर्फे मुकुटबन, पाटण, लिंगटी येथे रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. याला मतदारांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
विजय चोरडिया यांच्यामुळे ‘सहकार’ला बळकटी
वसंत जिनिंगचे विद्यमान अध्यक्ष ऍड देविदास काळे यांना यावेळी विजय चोरडीया यांची साथ मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते निस्वार्थ भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. गोरगरिब, शेतकरी, कामगार यांच्या मदतीसाठी विजय चोरडिया नेहमी तत्पर असतात. एक धडाडीच्या व्यक्तीमत्वाची ऍड काळे यांना साथ लाभल्याने जय सहकार पॅनलला आणखी बळकटी मिळाली आहे.
संस्था कुणाच्या हाती सुरक्षित याची मतदारांना जाण – ऍड. काळे
वसंत जिनिंग ही आर्थिक संकटात होती. गेल्या 10 वर्षात आम्ही वसंत जिनिंगला फक्त आर्थिक डबघाईतून बाहेर काढलेले नाही, तर उत्पन्नाचे विविध स्रोत ही निर्माण केले. कोरोनासारख्या कठिण काळातही आम्ही ग्राहकांचे हित जोपासले. माझा गेल्या 10 वर्षांतील कार्यकाळात झालेल्या प्रगतीचा आलेख पाहता जिनिंग कुणाच्या हाती सुरक्षित आहे याची मतदारांना चांगली जाण आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत संस्थेचे सुज्ञ मतदार परत आम्हाला संधी देणार, असा विश्वास आहे.
– ऍड. देविदास काळे – जय सहकार पॅनल
संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. तसेच वणी, कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या 7 ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे. याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत. हे सध्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आज संस्थेकडे 22 कोटी, 50 लाख 8 हजार 919 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर संस्थेवर फक्त 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज आहे. संस्थेमध्ये सध्या 20 कर्मचारी नोकरीवर आहेत. तर आज संस्थेचे सुमारे 11 हजार सभासद आहेत.
Comments are closed.