वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?
5 ठिकाणी जिनिंग, मंगल कार्यालय, सभागृह, लॉन अशी संस्थेची मोठी व्याप्ती.... आज संस्थेकडे 22.5 कोटींची मालमत्ता....
जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी व परिसरात वसंत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 50 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास या संस्थेला आहे. अनेक नामवंत व्यक्ती या संस्थेला अध्यक्ष म्हणून लाभले. आज या संस्थेचा इतिहास आपण बघणार आहोत शिवाय संस्थेचा चेहरामोहरा कसा बदलला याचा आढावाही आज आपण घेणार आहोत.
दि वसंत कॉपरेटिव शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड नावाने असेलेली ही संस्था वसंत जिनिंग नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात 1950 मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला सहकारी कारखाना होता. त्यानंतर अल्पावधीतच राज्यभर सहकार चळवळ सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्रात सहकारातून अनेक उद्योग उभारले गेले. यात वणी देखील मागे राहिली नाही.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्याच्या विकासासाठी सरकारने सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा करण्यात आला. याला अनुसरून 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियम लागू करण्यात आले. त्यानंतर वणीत सहकारातून शेतक-यांसाठी एखादा उद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अवघ्या तीन वर्षातच म्हणजे 1964 साली वसंत कॉपरेटिव शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड म्हणजेच वसंत जिनिंगची स्थापना झाली. दादासाहेब हुड या संस्थेचे पहिले अध्यक्ष तर गोविंदराव चकोर हे पहिले उपाध्यक्ष होते. संस्थेत 17 जणांचे संचालक मंडळ होते.
ही संस्था महत्त्वाची होती. त्यामुळे परिसरातील अनेक दिग्गजांना ही संस्था खुणावायची. माजी आमदार स्व. नानासाहेब गोहोकर यांनी 3 टर्म या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. तसेच दादासाहेब नांदेकर यांनी 2 टर्म, वसीम अहमद यांनी 1 टर्म (2 वर्ष) ऍड भास्कर ढवस, सुनील नांदेकर हे होते. 2010 पासून पुढे दोन टर्म ऍड देविदास काळे हे अध्यक्ष आहे.
वसंत जिनंग महत्त्वाची का?
आज संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. तसेच वणी, कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या 7 ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे. याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत. हे सध्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आज संस्थेकडे 22 कोटी, 50 लाख 8 हजार 919 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर संस्थेवर फक्त 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज आहे. संस्थेमध्ये सध्या 20 कर्मचारी नोकरीवर आहेत. तर आज संस्थेचे सुमारे 11 हजार सभासद आहेत.
चेहरामोहरा बदलवण्यात ऍड देविदास काळे यांचा सिंहाचा वाटा
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड देविदास काळे यांचा संस्थेच्या संचालक मंडळात 1988 साली पहिल्यांदा प्रवेश झाला. तेव्हापासून ते 2010 पर्यंत संचालक मंडळात होते. 2010 मध्ये त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले. या निवडणुकीत विजय मिळवत ते अध्यक्ष झाले. तेव्हापासून आजपर्यंत ते या पदावर कायम आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक चढउतार आले. संस्था डबघाईला जात होती. त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेत संस्थेला उभारी देण्याचे काम केले.
जेव्हा ऍड. देविदास काळे हे संस्थेच्या संचालक मंडळात आले. तेव्हा संस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट होती. कर्मचा-यांचे पगार देखील निघू शकत नव्हते. मात्र त्यांनी सूत्र हाती घेताच त्यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत शोधले. त्यातून संस्थेची आर्थिक बाजू तर त्यांनी मजबूत केली सोबतच संस्थेचा झपाट्याने विस्तारही केला. संस्थेचा विस्तार जरी झाला असला तरी काळानुरूप संस्थेचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे होते. जिनिंग, मंगल कार्यालय हे मेन्टनन्स व अपग्रेड न झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. मात्र यातून ऍड देविदास काळे यांनी मार्ग काढला. वसंत जिनिंगच्या मालकीची वणी येथील यवतमाळ रोडवर जागा होती. ती जागा तब्बल 21 कोटी मध्ये विकली गेली. त्या रकमेचा मोठा फायदा संस्थेला झाला.
…आणि संस्थेने कात टाकली
विक्रीच्या रकमेतून चेहरामोहरा बदलवण्याचा निर्णय ऍड देविदास काळे यांनी घेतला. संस्थेद्वारा निळापूर मार्गावर 7.50 कोटी मध्ये दुसरी जिनिंग विकत घेण्यात आली. मुकूटबन, शिंदोला, मारेगाव व मार्डी येथे जिनिंग तर होते. मात्र जिनिंगमध्ये अत्याधुनिक मशिन नव्हत्या. त्यामुळे 12 कोटी रुपयांत 4 जिनिंग फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक मशिन बसवण्यात आल्या व संपूर्ण जिनिंगचे ऑटोमायजेशन करण्यात आले.
जिनिंगसोबतच मंगल कार्यालय हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. मात्र एकेकाळी परिसरात सर्वात मोठ्या असलेल्या शेतकरी मंदिर या मंगल कार्यालयाची काळानुसार दुरवस्था झाली. ऍड देविदास काळे यांनी आलेल्या रकमेतून शेतकरी मंदिर सभागृहाचे नूतीकरण केले. वसंत जिनिंग हॉल, वसंत जिनिंग लॉन इत्यादीची उभारणी केली. कार्यालयीन इमारतीची दुरस्ती व फर्निचरचे कार्य ऍड. देविदास काळे यांनी त्यांच्या काळात पूर्ण केले. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वसंत जिनिंग निवडणूक: जय सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन
Comments are closed.