तालुका प्रतिनिधी, वणी: गेल्या आठ दहा दिवसांपासून तालुक्यात सतत पडत आहे. मोठ्या बाजारपेठेसह ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. परिणामी ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढलेत. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे. ‘भाजी गं भाजी, तुला कसली नाराजी!’ असंही लोक गमतीनं म्हणत आहेत.
वणी भाजीबाजारात भाज्यांची आवक जिल्ह्यातील आणि परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या मालांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील शेतकरी स्थानिक पातळीवर भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आवक मंदावली आहे. सध्या किरकोळ बाजारात वांगे प्रति किलो 50 ते 60 रुपये आहे. चवळीच्या शेंगा 70 ते 80 रुपये प्रति किलो आहेत.
कांद्याचे भाव 50 ते 60 रुपये, पत्ताकोबी 40 ते 50 रुपये प्रति किलो, आलू 40 ते 50, टोमॅटो 40, भेंडी 40 ते 50 रुपये प्रति किलो आहे. दोडका 40 ते 50 रुपये प्रति किलो, तोंडली 60 रुपये प्रति किलो, आले, कोथिंबीर 20 रुपये जुडी, हिरवी मिरची, शिमला मिरची 20 रुपये पाव, पालक, मेथी भाजी 80 रुपये प्रति किलो आहे.ग्रामीण भागासह मोठ्या बाजारपेठेतून आवक कमी झाल्यानेही भाजीपाल्याचे भाव वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात आवक वाढताच भाज्यांचे भाव कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सणांमुळे भाजीपाल्याची मागणी वाढणार आहे. परिणामी येणाऱ्या दिवसांतही भाजीमार्केट तेजीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)