विकेश पानघाटे – डोळ्यांत आत्मविश्वासाची चमक, हृदयात लोकांच्या वेदनेची जाणीव
विकेश पानघाटे यांची काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड - वाचा विशेष आर्टिकल.....
हसतमुख चेहरा, डोळ्यांत आत्मविश्वासाची चमक आणि हृदयात सर्वसामान्यांच्या वेदनेची जाणीव — हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकेश भास्करराव पानघाटे. अडीअडचणीत सापडलेल्या माणसासाठी तत्परतेने धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्यांनी काँग्रेस पक्षाशी अखंड निष्ठा राखली आहे. संघटनाची पातळी मजबूत करत, सामान्य कार्यकर्त्यापासून पक्षाचा विश्वास संपादन करत अखेर आज त्यांची वणी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबाबत सर्वच स्तरांतून “संघटनेशी एकनिष्ठ, जनतेशी जोडलेलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपलंस करणा-या तरुणाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
विद्यार्थी चळवळीतून नेतृत्वाच्या प्रवासाकडे
वणी तालुक्यातील सैदाबाद (नवरगाव) या छोट्याशा गावात जन्मलेले विकेश पानघाटे हे इंग्रजी साहित्यात पदवीधर आहे. शेती आणि व्यवसाय हे त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. त्यांच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून. कॉलेजला असतांना त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न उचलून धरले होते. त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. 2002 ते 2006 या काळात ते काँग्रेसच्या एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर युवक शहर काँग्रेसचे अध्यक्षपद आणि चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसच्या महासचिव पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 2024 मध्ये पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत वणी तालुका काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्षपद दिले. विकेश यांचा हा प्रवास केवळ पदांपुरता मर्यादित नाही—तो जनतेशी जोडलेला तर संघटनेशी निष्ठा असलेला आहे.
लोकांना जोडणं आणि अडचणीत धावून जाणं — हे त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य आहे. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. गुढीपाडवा उत्सव समिती, स्वराज्य युवा संघटना, लढा संघटना, आणि ‘लढा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या विविध संघटनांमध्ये त्यांनी कार्यकुशलता दाखवत नेतृत्वाची चुणूक दाखवली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विकेश पानघाटे यांच्यावर कार्यालयीन कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांनीही आपल्या कार्यकुशलतेची ठसठशीत छाप या कामात उमटवली. वणी, झरी आणि मारेगाव—या तिन्ही तालुक्यांतील प्रचार, प्रसाराचे काम त्यांनी अत्यंत चोखपणे बजावले. पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडले.
विकेश आपल्या निवडीचे श्रेय विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, ज्येष्ठ नेते ऍड देविदास काळे, संजय खाडे, टिकाराम कोंगरे, ओम ठाकूर, विवेक मांडवकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, मोरेश्वर पावडे, डॉ. कावडे या सर्व मान्यवरांना देतो.
राजकीय घराण्याचा कोणताही वारसा नसताना, केवळ निष्ठा, कर्तृत्व आणि जनतेशी असलेली नाळ याच्या जोरावर वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी विकेश पानघाटे यांनी नेतृत्वाची शिखरं गाठली आहेत. पदाची अपेक्षा न करता, संघटनासाठी सातत्याने काम करणं, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणं आणि प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय देणं—हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आज वणी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली आहे, ती फक्त एक पद नाही, तर त्यांच्या संघर्षमय प्रवासाला मिळालेली मान्यता आहे. विकेश पानघाटे यांना मिळालेली संधी म्हणजे नव्या पिढीसाठी प्रेरणा, आणि काँग्रेस पक्षासाठी एक नवा विश्वास आहे.
विकेश पानघाटे यांना नवीन जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा…
-निकेश जिलठे, संपादक वणी बहुगुणी



Comments are closed.