अनुभव, ज्येष्ठता, राजकीय जाण — नगराध्यक्षपदासाठी सज्ज पुष्पाताई आत्राम !

आदिवासी चळवळीची योद्धा पुष्पाताईं ठरणार इतरांपेक्षा सरस?

परिवर्तनवादी चळवळीची अग्रणी, समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव, लोकांच्या समस्येची उत्तम जाण, प्रभावी वकृत्वशैली, आणि विशेष म्हणजे नगरपालिकेच्या कामकाजाचा पूर्वानुभव— ही बलस्थानं आहेत नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार पुष्पाताई आत्राम यांची. गेल्या अनेक वर्षांपासून त्या समाजसेवेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केला आहे. 

पुष्पाताईंनी विविध सामाजिक आणि राष्ट्रीय पक्षांमध्ये मानाची पदं भूषवली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक मातब्बर पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. मोर्चा, आंदोलन, लोकांच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरणे, कार्याचा कोणताही गाजावाजा न करता सामाजिक कार्य सुरु ठेवणे, तरुणाईला लाजवेल अशा ऊर्जेने त्यांचे केवळ स्थानिकच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील कार्य सुरु असते. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या केवळ एक मजबूत उमेदवार नाहीत, तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलवू शकणाऱ्या गेम चेंजर ठरू शकतात.

पुष्पाताई आत्राम यांचा अल्प परिचय
वणीच्या रंगारीपुरा भागातील एक साधी गृहिणी ते प्रभावी समाजसेविका असा प्रेरणादायी प्रवास घडवणाऱ्या पुष्पाताई आत्राम यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या पुष्पाताईंनी 1991 साली अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि नगरसेविका म्हणून त्या निवडूनही आल्या. या कार्यकाळात त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. या काळात त्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केला, मात्र 2004 नंतर पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहून त्यांनी सामाजिक कार्यालाच आपले ध्येय मानले.

1979 साली बामसेफच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास आजही अविरत सुरू आहे. गेल्या चार दशकांत त्यांनी अनेक सामाजिक संघटना स्थापन करत चळवळींना दिशा दिली. साक्षरता अभियान असो, राष्ट्रीय एकात्मता संमेलन, हुंडाविरोधी सभा, आदिवासी जनजागृती मेळावे, साहित्य संमेलनं, महिला-बालक आरोग्य शिबिरं, कुटुंब कल्याण कार्यक्रम, वेठबिगार व कष्टकरी कामगारांसाठीचे उपक्रम—पुष्पाताईंच्या कार्याचा आवाका व्यापक आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली धडपड केवळ उपक्रमांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक प्रेरणादायी चळवळ ठरली आहे.

महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार स्वीकारताना

 

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनुभवाची ताकद
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा होताच इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. काहींना सामाजिक कार्याचा अनुभव आहे, तर काहींचा ना राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध आहे ना समाजकारणाशी. या स्पर्धेत पुष्पाताई आत्राम यांचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. नगरसेविका म्हणून त्यांनी पालिकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. राजकारणाची जाण असलेल्या पुष्पाताई आजही समाजकारणात कार्यरत आहेत. अनुभव, ज्येष्ठता आणि राजकीय जाण यामुळे त्या अधिक प्रभावी उमेदवार ठरतात.

गल्ली ते दिल्लीपर्यंत कामाचा आवाका
पुष्पाताई आत्राम यांचे कार्य केवळ वणीपुरते मर्यादित नाही. सामाजिक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक पातळीपासून थेट राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत आपला ठसा उमटवला आहे. बहुजनवादी विचारसरणीच्या चळवळीत त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या. वणीच्या गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत त्यांनी विविध आंदोलन, परिसंवाद यात सहभाग घेतला आहे. त्यांचा प्रवास हा संघर्ष, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीने भरलेला आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केला. याशिवाय विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार, आदिवासी समाजभूषण पुरस्कार आणि वणी भूषण या सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय असून अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन आणि समतापर्व या मंचांवर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुष्पाताईंचा हा प्रवास केवळ पुरस्कारांचा नाही, तर समाजाला दिशा देणाऱ्या कार्याचा आहे.

अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसला, तरी उमेदवारीच्या शर्यतीत पुष्पाताई आत्राम यांचे नाव ठळकपणे पुढे येत आहे. त्यांच्या चार दशकांच्या सामाजिक कार्याचा ठसा, नगरपालिकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आणि राजकीय जाण ही बलस्थानं त्यांना इतर इच्छुकांपेक्षा वेगळी ओळख देतात. पक्षीय समीकरणं काहीही असली, तरी मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या उमेदवारांमध्ये पुष्पाताई आत्राम अग्रस्थानी राहतील. 

Comments are closed.