‘सिमेंट कंपनीतील कामगारांमुळे ग्रामवासीयांना कोरोनाचा धोका’
मुकूटबन ग्रामपंचायतची तहसीलदार व पोलीस स्टेशनला तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथे गेल्या एक वर्षांपासून खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कंपनीत महाराष्ट्र राज्यासह उत्तरप्रदेश मध्यप्रदेश झारखंड बिहार तामिळनाडू ओरिसा तेलंगणा आंध्रप्रदेश नागपूर चंद्रपूरसह इतर राज्यातील व परिसरातील जवळपास ४ ते ५ हजार कामगार व इतर पदावर काम करीत आहे. होळी सणाकरिता स्वगृही गेले होते. काही प्रमाणात मजूर व कामगार परत आले. परंतु तेव्हाच लॉकडाऊन लागक्याने सिमेंट कंपनीत काम करणारे दोन ते अडीच हजार कामगार कंपनीत अडकले आहे.
कामगार आपल्या गावाकडे जाण्याकरिता धावपळ करीत आहे परंतु लॉकडाऊन मुळे कामगार कंपनीत तर त्यांचे कुटुंब घरी त्रस्त झाले आहे. अनेक कामगारांच्या कुटुंबियांना जगणेसुद्धा कठीण झाल्याची माहिती आहे. सिमेंट कंपनीत एक आठवडा पासून काम सुरू करण्यात आले. कंपनीतील कर्मचारी अधिकारी मुकूटबन वणी येथे राहत असून कंपनीत जाण्याकरिता चारचाकी वाहनाचा वापर केला जातो. परंतु सदर वाहनात १० ते १५ कामगार कोंबून मास्क न लावता येत आहे. ज्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊन मुकूटबन ग्रामवासीयांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसेच कंपनीचे काम सुरू झाल्याने परराज्यातून ट्रक व जड वाहनाने कंपनीच्या साहित्याचे आयात सुरू आहे. कंपनी नजीक सार्वजनिक रस्त्यावर वाहन ठेऊन चालक व क्लिनर ट्रक थांबवून बिनधास्त गावात फिरताहेत. सदर ट्रक चालक व क्लिनर यांची तपासणी करण्यात आले की नाही असा प्रश्न ग्रामपंचायतने केला आहे. अश्या व्यक्तीमुळे संपुर्ण गाव कोरोनाचा महामारीच्या कचाट्यात सापडण्याची भीती ग्रामपंचायत व्यक्त केली आहे.
सरकारने राज्यातील व बाहेर राज्यातील कामगार मजूर विद्यार्थी व इतर लोकांना आपल्या घरी जाण्याची मुभा दिली आहे. परंतु आरसीसीपीएल कंपनीतील दोन ते अडीच हजार कामगार पैकी ९५ टक्के कामगार आपल्या गावी जाण्याकरिता धावपळ करीत आहे परंतु त्यांना अजूनही परवानगी मिळाली नाही ज्यामुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत आहे.
सिमेंट कंपनीतील शेकडो कामगार आपल्या गावी जाण्याकरिता पोलीस स्टेशनला नाव नोंदणी करीत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याची ओरड कामगारांच्या तोंडातून ऐकला मिळत आहे.
शासनाच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या गावी जाण्याकरिता सर्वसोय सुविधा उपलब्ध व सहकार्य करण्याचे काम कंपनी व ठेकेदाराचे आहे. असे नमूद असताना सुद्धा या सर्व बाबीची पूर्तता कंपनी व ठेकेदार करीत नसल्याची तक्रार आहे. कंपनी व ठेकेदार यांनी अडीच हजार लोकांची कागदपत्राची पूर्तता करून सहकार्य करावे अशी तक्रार ग्रामपंचायत सरपंच शंकर लाकडे यांनी तहसीलदार व ठाणेदार मुकूटबन याना केली आहे.