शेतकरी स्वराज युवा संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण
आंदोलकांचा टायर जाळून व मुंडण करून निषेध
नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात आज गुरुवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी शेतकरी युवा संघटनेतर्फे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यावेळी संतप्त आंदोलकांनी टायर जाळत व मुंडण करत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे सुमारे 1 तास ट्राफिक जाम झाली होती. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नगर पंचायत मधील समस्या तात्काळ सोडाव्यात या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांचे नेतृत्वात हे आंदोलन झाले.
विविध मागण्यांसाठी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेद्वारा 13 ऑक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या मार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र मागण्यांची दखल न घेतल्याने चक्काजाम व मुंडन आंदोलनाचा ईशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. अखेर आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास स्वराज्य शेतकरी युवा संघटनेतर्फे स्थानिक आंबेडकर चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास हे आंदोलन चालले.
आंदोलनाला हिंसक वळण
चक्का जाम आंदोलनामुळे दोन्ही दिशेने ट्राफिक जामची समस्या निर्माण झाली. आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मुंडण करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. मात्र नंतर आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी टायर जाळत आपला निषेध नोंदवला. आंदोलकांची तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी येऊन भेट घेतली. त्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
काय आहेत प्रमुख मागण्या?
तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. कापूस आणि सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत करावी. कचरा डेपोपासून शेताचे संरक्षण करावे. एमआयडीसी त्वरित सुरू करावी. शहर विकास निधीतून झालेल्या 3 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करावी. घरकुल लाभार्थ्यांना तिसरा हप्ता त्वरित द्यावा. कोंडवाड्याचे टेंडर काढण्यात यावे. शहरात क्रीडासंकुल तयार करावे. इत्यादी मागण्या आंदोलकांच्या आहेत.
स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतूत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सचिन पचारे, विशाल किन्हेकार, विजय मेश्राम, राजू मांदाडे, तुकाराम वासाडे, सोमेश्वर गेडेकर, अनिल राऊत, गोपाळ खामनकर, राजू खडसे, राजू गौरकार, नितीन कडू, अभय गवळी, अतुल देवगडे, शेषराव मडावी, सूरज गमे, प्रवीण काळे, विकास राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
खाली क्लिक करून पाहा आंदोलनाचा व्हि़डीओ….