विश्वास नांदेकर: कलासक्त नेतृत्वाचे निर्वाण

वाचा ज्येष्ठ पत्रकार श्रीवल्लभ के.सरमोकदम यांचा विशेष लेख

विश्वास नांदेकर: कलासक्त नेतृत्वाचे निर्वाण
– श्रीवल्लभ के.सरमोकदम (९५२७३५३४३४)
दि.२१ डिसेंबर रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी अखेरच्या प्रवासाला सुरुवात केली अन् वणीच्या राजकीय पटलावरचे कलासक्त नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे त्यांच्या निकटस्थांना कळून चुकले. अर्थात गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याची चाहूल लागली होती. जीवन – मरणाचा फेरा शाश्वत असल्याने ते सत्य स्विकारण्याशिवाय कुणाही जवळ पर्याय नव्हता. त्यानंतर उरल्या त्या केवळ आठवणीच! काळ बनून आलेल्या त्या विधात्याच्या हाती एखाद्याच्या आयुष्याची दोरी असली तरी त्याच्या स्मृति,आठवणी सोबत नेण्यास मात्र तो असमर्थ असतो. म्हणूनच ती शिदोरी अनेकांसाठी स्मृतिगंध ठरते. सामाजिक व राजकीय वलय असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत आठवणींच्या कक्षा अधिकच रुंदावतात. त्याला अनेक पदर असतात. कधी हे पदर दृष्टीपथात येतात तर कधी दृष्टीआड होतात. विश्वास नांदेकर यांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

वणीच्या राजकीय पटलावर आमदार म्हणून अनेकांनी आपली राजकीय कर्तबगारी गाजवली. त्यात नांदेकरांचाही समावेश आहे. परंतू वणीच्या राजकारणात एखादे कलासक्त नेतृत्व म्हणून केवळ विश्वासभाऊंचा उल्लेख करावा लागेल. संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. ते नावापुरते नव्हते तर त्यात ते कमालिचे लिन होत असे. शास्त्रीय संगीतातही त्यांची तंद्री लागत होती. राजकारणात वाववरताना त्यांनी अगत्यपूर्ण आपला छंद जोपासला होता. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरी हार्मोनिअमची व्यवस्था केली होती. अनेकदा ते स्वतः त्यावर बोटे फिरवत गायनाच्या स्वानंदात रमत होते. नितीन मुकेश त्यांचे आवडते गायक होते. त्यांची गाणी विश्वासभाऊंच्या ओठावर कायम असायची.

मराठी संतांचे अभंग,भजन यातही त्यांची विशेष रूची होती. अर्थात संगीतावरचे हे प्रेम त्यांच्या ठायी विद्यार्थी दशेपासूनच होते. महाविद्यालयातील स्नेहसंम्मेलनादरम्यान सांगितीक कार्यक्रमात त्यांचा आवर्जून सहभाग असायचा. यावेळी गायन, हार्मोनियम यावर ते स्वार होत असताना प्रसंगी तबल्याचा ठेका धरण्याची संधीही ते सोडत नव्हते. सांगितीक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत. प्रसंगी वेळात वेळ काढून त्याचा आस्वादही घेत. कलेची ही आसक्ती त्यांच्या आमदारकीच्या काळातही त्यांच्या सोबतच होती. म्हणूनच की काय, त्यांनी प्रसिध्द टी.व्ही.शो सारेगमप कार्यक्रमातील महेश कंठे व अनिरुध्द जोशी या कलाकारांना पक्षाच्या मंचावरुन वणीत सादर केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बाबा महाराज सातारकर यांच्या अमृतवाणीचा लाभ विश्वासभाऊंमूळे वणीकरांना घेता आला. कलाच नव्हे तर क्रिडा क्षेत्रातही त्यांची रुची वाखाणण्याजोगी होती. कबड्डी व व्हाॅलिबाॅल सामन्यांच्या भव्य आयोजनातही ते हिरिरीने सहभागी झाल्याचे आजही अनेकांना स्मरते.

अलिकडे राजकीय क्षेत्रात कोणत्याही प्रसंगी लावणी अत्यंत प्रतिष्ठेची ठरत आहे. सिने नट – नट्यांनाही राजकीय मंचावर प्राधान्यच आहे. अशा परिस्थितीत विश्वासभाऊ मात्र राजकारण करताना कलेची कास धरुन होते. “राजकारणात आलो नसतो तर मी संगीतातच रमलो असतो.”असे ते अनेकदा त्यांच्या रसिक आप्तेष्टांजवळ बोलत होते. आता मात्र या सर्व आठवणीच ठरल्या आहेत. पण जी मंडळी या सर्व प्रवासाची साक्षीदार आहे त्या सर्वांसाठी तो एका सर्जनशील नेतृत्वाच्या स्मृतिंचा ठेवा आहे. भविष्यात राजकीय पटलावर तो जतन व्हावा हीच विश्वासभाऊंना खरी श्रध्दांजली असेल!

– श्रीवल्लभ के.सरमोकदम (९५२७३५३४३४) दि.२२/१२/२०२५ सोमवार

Comments are closed.