विश्वास नांदेकर यांचे आमदारांवर खळबळजनक आरोप

आजी माजी आमदारांमध्ये जुंपली... एकमेकांवर आरोपांच्या फैरी

0

जब्बार चीनी, वणी: सध्या उन्हाळा तापला असताना दुसरीकडे वणीतील राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. यात पदाचा गैरफायदा घेणे, सुडाचे राजकारण करणे, सामाजिक उपक्रमात आडकाठी करणे यासह त्यांचे मानसिक संतूलन बिघडले असल्याचाही धक्कादायक आरोप केला आहे. त्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारही आक्रमक झाले असून त्यांनीही त्याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राज्यात रंगणारा सेना-भाजपचा हा सामना आता स्थानिक राजकारणात रंगणार असून येत्या काही दिवसात या दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगू शकतो.

माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे आ. बोदकुरवारांवर आरोप…

आमदारांचे सुडाचे राजकारण –
कोरोनामुळे मतदारसंघात मोठ्या समस्या निर्माण झाल्या असतानाही आमदार या समस्या सोडवण्याऐवजी राजकारण करण्यात गुंग आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे जनता दहशतीत जगत असताना त्यांना मानसिक आधार देण्याऐवजी आ . बोदकुरवार हे घरात बसून सुडाचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जनतेसाठी असलेल्या चांगल्या उपक्रमातदेखील बाधा येत आहे . खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे एककलमी उपक्रम आमदार महोदयांनी राबविला आहे.

आमदारांची चांगल्या कामात आडकाठी-
लोकप्रतिनिधी या नात्याने कोरोनासारख्या भयावह संकटात आमदार बोदकुरवार यांनी विरोधकांना सोबत घेऊन जनपयोगी उपक्रम राबविणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता आ. बोदकुरवार हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी चांगल्या कामात बाधा आणत असून ही अतिशय निषेधार्थ बाब आहे असाही आरोप करण्यात आला आहे.

आमदारांनी पळवली तलावातील माती –
वणी शहरात शिंगाडा तलावाच्या खोलिकरणाचे काम सुरु आहे. खोलिकरण दरम्यान निघणारी माती ही सामान्य शेतक-यांना मोफत देणे अपेक्षित होते. परंतु आमदार महोदय सदर माती सामान्य शेतक-यांना शेतात टाकण्यासाठी देण्याऐवजी स्वतःच्याच शेतासाठी ट्रक, ट्रॅक्टर द्वारे नेत आहेत असा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे.

आमदारांच्या पक्षाने सोडली नैतिकता…
मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात वणी शहर व मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे मोठी दारू तस्करी पोलिसांनी उघडकीस आणली व आरोपींनाही जेरबंद केले. कुंभा येथील धाडीत भाजपचा नगरसेवकच सापडला. ही केवळ आमदारासाठीच नाही, तर भाजपसारख्या केंद्रातील सत्तेत असलेल्या राजकीय पक्षासाठी अतिशय लाजीरवाणी बाब आहे.

शिवभोजन केंद्राची तक्रार –
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने सामान्य माणूस उपाशी राहू नये म्हणून केवळ ५ रुपयांत शिवभोजन थाळी सुरु केली आहे. या केंद्रावरून दररोज 100 लोकांना लाभ दिल्या जात होता. परंतु केंद्र संचालकाने त्यात वाढ करून स्वत: हून १५0 लोकांना शिवभोजन थाळी देणे सुरु केले. परंतु येथेही आमदार बोदकुरवार यांना ही बाब खुपली व त्यांनी शिवभोजन थाळी केंद्राच्या विरोधात तक्रार केली.

रामलू आईटवारांचा राडा –
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा खास हस्तक समजल्या जाणारा झरीतील भाजपचा कार्यकर्ता रामलू आईटवार यांनी बुधवारी मुकूटबन बाजार समितीत राडा केला. याला खुद आमदारांचे पाठबळ होते. या प्रकरणानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आमदार हे मुकूटबन येथे तळ ठोकून होते व ठाणेदारांवर दबाव टाकत होते. परंतु प्रकरण अतिशय गंभीर असल्याने आमदारांची डाळ शिजली नाही.

आईटवारांच्या गोरखधंद्यांना आमदारांचा आशीर्वाद-
रामलू आईटवार याचे पाटण येथे स्वतःचे स्वस्त धान्याचे दुकान असून या शिवाय दुसऱ्याच्या नावावर असलेली शासकीय स्वस्त धान्याची दोन दुकाने रामलू आईटवार हा स्वत चालवित आहे . मात्र त्याला आमदाराचे पाठबळ असल्याने अद्यापही त्याचा हा गोरखधंदा सुरु आहे. तो शासकीय धान्याचा काळाबाजारही करीत असल्याचीही चर्चा आहे.

पंचायत समितीच्या गाळा प्रकरणात स्टे –
वणी पंचायत समितीमध्ये २००९ ते २०१४ या काळामध्ये पंचायत समिती सभागृहाने पंचायत समितीचे उत्पन्न वाढावे याकरिता खाली जागेवर रस्त्याच्या बाजुला गाळे निर्माण केले होते . या गाळ्याचे सर्व सोपस्कार डीआरडीए मार्फत करून घेण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्याचे बांधकाम झाले व या गाळ्यांचा लिलाव करुन गरजू लोकांना ते वाटप केले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याची वृत्तपत्रातून रितसर निविदा काढण्यात आली. मात्र विद्यमान आमदाराच्या काही कार्यकर्त्यांना ते गाळे मिळू शकले नाही. जे निकषात बसत नव्हते म्हणून त्यांना ते गाळे मिळाले नाही. शेवटी चिडून जाऊन या प्रकरणावर त्यांनी वरिष्ठांकडून स्टे मिळविला. ज्या लोकांना हे गाळे मिळाले. त्या लोकांनी रितसर पैसेदेखील भरले होते. आमदारांच्या अडेलतटू धोरणामुळे गाळ्यांच्या सभोवतालचे अतिक्रमणदेखील काढू दिले नाही. त्या गाळ्यांचा वापर होऊ नये, हा त्यामागील उद्देश होता.

आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले-
राज्यातील भाजपची सत्ता संपुष्टात आल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या त्याच्या वर्तनाचा फटका मात्र सामान्य जनतेला बसत आहे.

काय म्हणतात या आरोपांवर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार…

सुडाचे राजकारण –
मी आणि माझ्या कार्यकर्त्यांचे काम सुरूच….
मी कधीच सुडाचे राजकारण केलेले नसुन कोरोनाच्या संकटकाळात जवळपास 5 हजार लोकांना जेवण दिले. 1700 ते 1800 अन्न धान्याच्या किट वाटल्या. बाहरगावी जाणा-या लोकांना परवानगी मिळवून देण्याकरिता मी व माझे कार्यकर्ते काम करीत आहो.

शिवभोजन थाळी –
मी फक्त  कागदपत्रे मागितली…
शिवभोजन थाळी केंद्र संदर्भात कोणतीही तक्रार केलेली नाही. तशी तक्रार असेल तर माझे चॅलेन्ज आहे ती दाखवून द्यावी. मी फक्त तहसीलदारांना या केंद्राच्या संदर्भात कागदपत्रे मागितले. यात गैर काय आहे?

रामलू आईटवार यांचा राडा –
…. तर मी राजकारण सोडेन, अन्यथा त्यांनी सोडावं…
आईटवार यांनी समितीत कापसासाठी नंबर लावला होता. पण तिथे नंतर नंबर लावलेल्यांच्या गाडया आधी सोडल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बाजार समितीच्या सचिवाला विचारणी केली व आवेशात टेबलावर थाप दिली. याव्यतीरिक्त त्यांनी काहीही केलेले नाही. आईटवार यांच्यावर गुन्हा दाखल न होण्याकरीता मी मुकुटबनला तळ ठोकुन होतो यात काहीही तथ्य नाही. खरे म्हणजे मी मागील दहा दिवसांपासून मुकुटबन किंवा झरी तालुक्यात पायसुद्धा ठेवलेला नाही. जर मी मुकुटबन ला होतो हे त्यांनी सिद्ध करावं, सिद्ध केल्यास मी राजकारण सोडुन देईल, अन्यथा त्यांनी राजकारण सोडुन दयांव.

पंचायत समितीचे गाळे प्रकरण –
पाच वर्षांनंतर जाग का आली?
पंचायत समितीचे ब्लाँक 2014 साली शिवसेनेचा सभापती असतानी गाळे हर्रास करताना नियमांचे पूर्णपणे पालन केले गेले नव्हते. आर्थीक हीत साध्य करून मर्जीतल्या लोकांना हे देण्यात आले होते. त्यासंबंधी आपण तक्रार करून स्टे मिळवीला. पाच वर्षानंतर आताच यांना जाग कशी आली. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिंगाडा तलावाच्या मातीचे प्रकऱण –
मी ही एक शेतकरीच आहे…
शहरातील शिंगाडा तलावाच्या खोलिकरणाचे काम सुरु आहे. खोलीकरणा दरम्यान, निघणारी माती हि ज्यांना हवी आहे त्यांना विनामुल्य देण्यात येत आहे. अनेक शेतकरी ही माती घेउन जात आहे. मीही एक शेतकरी आहे आणि मी 15 ते 20 ट्रीपा आपल्या गाडीने वावरात टाकल्या तर त्याच्यात काय चुकीचे आहे.

मानसिक संतुलन बिघडलेले आहे –
माजी आमदाराने आत्मचिंतन करावे –
मी सलग निवडून आलो आहे. तर माजी आमदार सलग तीन निवडणुकीत पराभुत होत आहेत. ते का पराभूत होत आहेत. यावर आत त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ते केल्यास कुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे हे कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.