वणी बसस्थानकात सोयी-सुविधांचा अभाव; प्रवाशांची गैरसोय
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिले निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एसटी बसस्थानकावर प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधांचा गंभीर अभाव असल्याने मनसेतर्फे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. बसस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात, मात्र स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि देखभाल या सर्वच बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या तोट्या निष्क्रिय अवस्थेत आहेत. वॉटर फिल्टरची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना थेट अशुद्ध पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. “आगाराचे प्रवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे बोढे यांनी नमूद केले आहे. त्यांनी तातडीने बसस्थानकात पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, नियमित साफसफाईचा अभाव जाणवतो. यामुळे प्रवाशांना अस्वच्छ वातावरणात बसावे लागते. मनसेने याकडे गंभीरपणे लक्ष वेधून, “साफसफाईचा अभाव हा प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो,” असा इशाराही दिला आहे.
मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर बसस्थानकातील पाणी पिऊन प्रवाशांची तब्येत बिघडली, तर त्याची पूर्ण जबाबदारी आगार प्रमुखांवर राहील.” याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी कृष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सूरज पळसकर, हिरा गोहोकार यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments are closed.