वणीत काँग्रेसला जबदस्त बुस्टिंग… लोकांच्या प्रश्नांवर नेते, कार्यकर्ते रस्त्यावर

पहिल्यांदाच काँग्रेस प्रभावी विरोधी पक्ष म्हणून समोर, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला उभारी

निकेश जिलठे, वणी: गेल्या काही काळापासून वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रभावीपणे ऍक्टिव्ह झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विजय आणि राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमधली मरगळ दूर झाली आहे. त्यातच संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने सर्वसामन्यांचे विविध प्रश्न उचलून निवेदन आणि आंदोलनाचा सपाटा सुरु केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून वणी विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे. तर पाच वर्ष नगरपालिकाही भाजपच्या ताब्यात होती. मात्र एक विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका ही काहीशी निष्क्रीय राहिली होती. मात्र आता पहिल्यांदाच एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस समोर येताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते देखील विधानसभेच्या कामाला लागले आहेत. राजकीय आढाव्याच्या आजच्या भागात आपण काँग्रेसचा कार्यकाळ व संजय खाडे यांचा नवीन नेतृत्व म्हणून उदय, याचा आढावा घेणार आहोत.

वणी काँग्रेसचा बालेकिल्ला 
माजी आमदार वामनराव कासावार हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 चा अपवाद वगळता ते 2014 पर्यंत 20 वर्ष  ते आमदार होते. त्यानंतर वणी हा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. गेल्या 10 वर्षांत हा भाजपच्याच ताब्यात आहेत. या 35 वर्षांच्या काळात 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. तर मागील 10 वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ सोडला तर काँग्रेस वणी विधानसभा, नगरपालिका व राज्यात विरोधी बाकावर आहे. मात्र विरोधी पक्षात असताना सत्तेची सवय झालेल्या काँग्रेसचा स्थानिक राजकारणात विरोधी पक्ष म्हणून कार्यकाळ निराशाजनक राहिला. नगरपालिकेच्या तारेंद्र बोर्डे यांच्या कार्यकाळात तर नगरपालिकेवर एकही मोर्चा निघाला नाही.

वणी विधानसभेत काँग्रेस मवाळ
2014 पासून वणी विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार आहेत. तर राज्यातील सत्ता देखील भाजपच्या हाती होती. त्यानंतर पुढच्या 5 वर्षांचा काळ काँग्रेससाठी निरस ठरला. एकीकडे कम्युनिस्ट पक्ष, मनसे लोकांच्या प्रश्नांवर कायम रस्त्यावर उतरत असताना, काँग्रेस मात्र वणीत विरोधी पक्ष म्हणून मवाळच राहिली. परिणामी सत्ताधारी पक्ष हे अधिकाधिक बळकट होत गेले तर काँग्रेसला त्याचा फटका बसू लागला. 2019 मध्ये दिवंगत खा. बाळू धानोरकर हे खासदार म्हणून चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आले. त्यांची ओळख एक आक्रमक नेते म्हणून होती. विविध आंदोलनातून त्यांचे नेतृत्त्व पुढे आले होते. त्यांच्यामुळे वणी विधानसभेतील काँग्रेसचे राजकारण बदलेले व काँग्रेस आक्रमक होईल, असे गृहित धरले जात होते. मात्र वणी विधानसभेतील काँग्रेस नेते, कार्यकर्ते मवाळच राहिले. 

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर
गेल्या काही महिन्यांपासून वणी विधानसभा क्षेत्रात संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस नागरिकांच्या विविध समस्या उचलत आहेत. शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारी, वेकोलि यासह वीज, पाणी, रस्ते इत्यादी समस्येवर काँग्रेस वारंवार निवेदन देत आहेत. सोबतच काँग्रेसने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरचे आंदोलनेही सुरु केले आहे. याशिवाय संजय खाडे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम देखील काँग्रेसद्वारा राबवले जात आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेसचे स्थानिक राजकारणात जे अस्तित्व हरवले होते. ते आता पुन्हा परतायला सुरुवात झाली आहे.

 

संजय खाडे यांची राजकीय कारकिर्द
संजय खाडे हे ग्रामीण राजकारणातून आलेले नेते आहेत. 1995 साली वयाच्या 23 व्या वर्षी ते उकणी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले व उपसरपंच झाले. त्यानंतर ते सलग 10 वर्ष उकणी या गावाचे सरपंच होते. या काळात ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करीत होते. पुढे ते युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले. पक्षाने त्यांचे कार्य पाहून त्यांना काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दरम्यानच्या या काळात त्यांनी वेकोलि कामगारांच्या विविध समस्या सातत्याने उचलल्या, अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांची कामगार नेता म्हणून ओळख निर्माण झाली. या शिवाय वेकोलि भागात राहणा-या गावक-यांच्या विविध समस्या, पूनर्वसन, प्रदूषण, शेतीच्या समस्या याबाबत विविध निवेदन, आंदोलन त्यांनी केले. सध्या त्यांनी आपल्या कक्षा रुंदावत वणी शहर आणि विधानसभा क्षेत्रावर आपला फोकस केला आहे. 

गेल्या 35 वर्षांच्या काळात राज्यात काँग्रेस अधिकाधिक वेळ सत्तेत राहिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस नेत्यांना विरोध पक्ष म्हणून भूमिका बजावण्याचा फारसा स्कोप नव्हता. गेल्या 10 वर्षांपासून वणी विधानसभा व नगरपालिकेत भाजपने तगडे आव्हान निर्माण केले आहे. विरोधी पक्ष निष्क्रिय असल्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींची लोकप्रियता वाढत गेली. मात्र काँग्रेसचा लोकसभेतील विजय, राज्यातील यश तसेच परिसरात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आता समोर येत आहे. त्यामुळे गेल्या वेळी विधानसभेची एकतर्फी झालेली लढत यावेळी रंगतदार होण्याची शक्यता आहे. (पुढील भागात पुन्हा एका पक्ष व नेत्याचा आढावा…)

Comments are closed.