वर्षभरात चोरट्यांनी लंपास केला 1 कोटीं पेक्षा अधिकचा मुद्देमाल

पोलिसांची कामगिरी समाधानकारक, पण गुन्हेगारीचे सावट कायम

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात 2025 हे वर्ष गुन्हेगारीच्या सावटाखाली गेले. घरफोडी करणारे चोरटे आणि दुचाकी चोरटे यांनी नागरिकांना अक्षरशः हैराण केले. तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास करून चोरट्यांनी पोलिसांना सततचे आव्हान दिले. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांनी वणी पोलीस स्टेशनच्या नोंदी भरल्या. पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून मोठा हिस्सा परत मिळवला असला तरी अजूनही काही चोरटे तावडीत सापडायचे आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी पोलिसांची काटेकोर गस्त व तपास हीच आता काळाची गरज ठरली आहे.

सन 2025 अखेर वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 785 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात गंभीर गुन्ह्यांचा मोठा आकडा आहे. खूनाचे 6, खुनाचा प्रयत्नाचे 2, दरोडा 1, जबरी चोरी 1, घरफोडी 19, तर चोरीचे तब्बल 71 गुन्हे नोंदवले गेले. याशिवाय दुखापतीचे 63, प्राणांकीत अपघाताचे 35, दारुबंदीचे 67, जुगाराचे 108 आणि इतर 449 गुन्हे नोंदले गेले. गुन्ह्यांच्या या आकड्यांतून सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते मालमत्तेच्या गुन्ह्यांनी. वर्षभरात चोरट्यांनी तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरफोडीच्या 19 गुन्ह्यांपैकी 10 गुन्हे उघडकीस आले असून 43,73,817 रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमालापैकी 16,31,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर चोरीच्या 71 गुन्ह्यांपैकी 36 गुन्हे उघडकीस आले असून 1,06,96,206 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता, त्यापैकी 74,72,356 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवला. मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये एकूण 63 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी वणी पोलीस स्टेशनच्या तपास क्षमतेचे दर्शन घडवते.

चोरट्यांचा मुसक्या आवळण्याचे आव्हान
वणी परिसरात गेल्या वर्षभरात घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांना मोठा त्रास दिला. पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असला तरी अजूनही काही चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडायचे आहेत. घरफोडी करणारे चोरटे व दुचाकी चोरटे यांची मुसक्या आवळणे हे वणी पोलीस दलासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व मालमत्तेच्या संरक्षणासाठी पोलिसांनी अधिक काटेकोर गस्त, तपास व कारवाई करणे आवश्यक ठरत आहे.

वर्षअखेरच्या आलेखानुसार भाग 1 ते 5 मधील 300 गुन्ह्यांपैकी केवळ 31 गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. म्हणजेच फक्त 10.33 टक्के गुन्हे तपासासाठी शिल्लक असून उर्वरित गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हेगारी आकडेवारीतून स्पष्ट होते की, वणी परिसरात चोरट्यांनी वर्षभरात मोठा आर्थिक फटका दिला असला तरी पोलिसांनी त्यातील मोठा हिस्सा परत मिळवण्यात यश मिळवले आहे.

Comments are closed.