वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपकडून श्रद्धांजली

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपकडून श्रद्धांजली

बहुगुणी डेस्क, वणी: 52 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 1974 रोजी वणी येथे महागाई विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारात निष्पाप 7 लोकांचा बळी गेला होता. ही घटना वणीच्या इतिहासातील सर्वाधिक भयंकर घटना म्हणून ओळखली जाते. या हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तसेच नातेवाईकांच्या वतीने 2 जानेवारी रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सन 1974 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळात निर्माण झालेल्या महागाईमुळे महाराष्ट्रात महागाई विरोधी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. वणी येथेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य पुरोगामी संघटनांच्या वतीने 2 जानेवारी 1974 रोजी आंदोलन आयोजित केले होते. सरकारविरोधी आंदोलन असल्याने वणी पोलिसांनी कृती समितीतील कॉ. शंकरराव दानव व इतर नेत्यांना एक दिवस आधीच अटक केली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

2 जानेवारीला नेत्यांच्या अटकेची माहिती कळताच जनता संतप्त होऊन मोठ्या संख्येने जमा झाली आणि आंदोलनात सहभागी झाली. यावेळी काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ सुरू केली. पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरल्याने पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात राजेश चिंडलिया (17 वर्षे), भास्कर मांडवकर (22 वर्षे), वासुदेव वाघ (22 वर्षे), कवडू सुतसोनकर (25 वर्षे), पुणाजी गिरडे (59 वर्षे), रामकृष्ण झिलपे (60 वर्षे) आणि दौलत पुंड यांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेने वणीकर हादरून गेले.

दरवर्षी 2 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिवंगत कॉ. शंकरराव दानव यांच्या पश्चात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. सरिता दानव, कॉ. विष्णू दानव तसेच हुतात्म्यांचे नातेवाईक मारोती पुंड, संजय सुतसोनकर, मारोती गिरडे आणि इतर बाबाराव गेडाम, आसिफ शेख, नारायण पेंटर आदींच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकाजवळ 2 मिनिटे मौन पाळून, मेणबत्ती प्रज्वलित करून, पुष्पहार अर्पण करून व महागाई विरोधात नारेबाजी करीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

Comments are closed.