बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील इंदिरा चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. कुत्र्याला हाकलण्यासाठी दगड मारल्याचा राग धरून एका महिलेसह तिच्या दोन मुलांनी एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मोहम्मद नजीम अब्दुल वहाब शेख (वय 40) हे वेकोलित कर्मचारी असून ते इंदिरा चौकात राहतात. दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजता ते फिरण्यासाठी घराबाहेर पडले. दरम्यान चौहान यांच्या घरासमोर बांधलेला कुत्रा अचानक त्यांच्यावर भुंकू लागला. त्यामुळे घाबरून त्यांनी कुत्र्याला दूर करण्यासाठी एक छोटासा दगड टाकला, मात्र तो कुत्र्याला लागला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कुत्र्याला दगड मारल्याने घरातील मंडळी घराबाहेर आल्यात. यांनी नजीम शेख यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केला. एकाने हातातील दगडाने नजीम यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले, तर दोन महिलांनी नजीम यांना बुक्यांनी मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.





Comments are closed.