पुरुषोत्तम नवघरे, वणी: सर्जनशीलतेचा, परिश्रमांचा आणि विश्वनिर्मितीच्या आदर्शांचा वारसा सांगणाऱ्या प्रभु श्री विश्वकर्मांच्या चरणी नतमस्तक होत संपूर्ण वणी शहर शनिवारी भक्तिरसात न्हाऊन निघाले. टाळ-मृदंगाच्या तालात गुंजणारी पदावली भजने, ढोल-ताशांच्या गजरात निघालेली भव्य शोभायात्रा आणि समाजबांधवांच्या एकत्रित उत्साहामुळे वणी अक्षरशः विश्वकर्मामय झाले होते. झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या झालेल्या या जयंती उत्सवाने केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीचा सुंदर आविष्कार घडवला.
शनिवार, दि. 31 जानेवारी 2026 रोजी श्री महादेव मंदिर, सुतारपुरा येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.00 वाजता रांगोळी स्पर्धेने उत्सवाची सुरुवात झाली. सकाळी 8.30 वाजता संस्थेचे अध्यक्ष अमन अशोकराव बुरडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत प्रभु श्री विश्वकर्मा यांच्या मूर्ती व प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. पदावली भजन, टाळ-मृदंग व ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण वणी शहर भक्तीमय वातावरणात दुमदूमून गेले. शहरातील चौकाचौकात भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गांधी चौकात महेश राखुंडे व मित्र परिवार यांनी चहा, बिस्कीट व केळ देऊन भाविकांचे स्वागत केले.
दुपारी 1.00 वाजता पौर्णिमा व गोविदा नानाजी निवलकर यांच्या हस्ते प्रभु श्री विश्वकर्मा पूजन संपन्न झाले. महिलांसाठी हळदीकुंकू, चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 1.30 वाजता मुख्य जयंती कार्यक्रमास सुरुवात झाली. मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नीलेश चौधरी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, वणी हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या खेमराज आत्राम (नगराध्यक्ष, नगरपरिषद वणी), राकेश बुग्गेवार (उपाध्यक्ष, नगरपरिषद वणी), आरती गिरीष वांढरे, अर्चना शंकर झिलपे (नगरसेविका), नितीन गोपालराव धाबेकर (नगरसेवक), शालीकराव रामचंद्र दुधलकर (सदस्य, झाडे सुतार समाज महासंघ), मंगलाताई पद्माकर झिलपे (अध्यक्ष, महिला मंच) व रुपक संजय अंडूस्कर (अध्यक्ष, युवा मंच) उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी प्रभु श्री विश्वकर्मा यांची महती सांगत सुतार समाजाच्या परंपरा, कौशल्य व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटन व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
समाजरत्न पुरस्कार
या वर्षाचा सुतार समाजरत्न पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक तथा सुतार समाज कार्यकारिणीचे उपाध्यक्ष देवराव सांबशिव बुरडकर यांना प्रदान करण्यात आला. समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सायंकाळी 3.00 ते 6.00 या वेळेत भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6.00 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच व युवा मंच यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्सवाला अविस्मरणीय रंगत आणली.




Comments are closed.