बहुगुणी डेस्क, वणी: प्रेम, ब्रेकअप आणि राग… या तिन्हींचा स्फोट झाला तो थेट वणीच्या भाजीमंडीत! काही वर्षांआधी दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झालं. मात्र काही वर्षांनी प्रेयसीचं प्रेम अचानक उफाळून आलं. तिला तिच्या एक्सची आठवण आली. ती कॉल करायची मात्र तो काही कॉल उचलत नव्हता. अखेर पोरीने पोराला भाजीमंडीत गाठलेच! जाब विचारत भररस्त्यात थापड-बुक्क्यांचा वर्षाव केला. ही मारकुंडी गर्लफ्रेंड इतक्यावरच थांबली नाही तर तिने मध्यस्थीला आलेल्या प्रियकराच्या आईचा चावा घेतला. यात दोघेही जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याची चांगलीच खमंग चर्चा रंगत आहे.
फिर्यादी प्रियकर फरहान ( नाव बदललेले वय 27) हा वणीतील खरबडा परिसरात राहतो. त्याचे वणीतीलच फरहीन (नाव बदललेले वय 24) प्रेमसंबंध होते. मात्र चार वर्षाआधी प्रेयसीने प्रियकरा विरोधात तक्रार दिल्याने फरहानने ब्रेकअप केले. तेव्हा पासून तो तिच्या संपर्कात नाही. मात्र चार वर्षांनी प्रेमाची धग उफाळून आली. ती गेल्या 8–10 दिवसांपासून फरहानला सातत्याने फोन करत होती. मात्र प्रियकर काही कॉल उचलत नव्हता. सातत्याने येणा-या कॉलमुळे त्याने तिचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर ती वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत होती. मात्र प्रियकर काही तिच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हता.
मारकुंड्या गर्लफ्रेंडचा हैदोस !
4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता फरहान हा भाजीमंडीत काम करत होता. तेव्हा अचानक तिथे त्याची एक्स गर्लफ्रेंड फरहिन पोहोचली. तिने “माझा फोन का उचलत नाहीस?” असा जाब विचारत थेट एक्स प्रियकराला शिवीगाळ सुरू केली. त्यावर प्रियकराने आपले संबंध तुटले आहे असे स्पष्ट केले. त्यावर प्रेयसी चांगलीच संतापली. तिने फरहानवर थापड-बुक्क्यांचा मारा केला. तसेच मारहाण करून प्रियकराला खाली पाडले.
दरम्यान तिथे प्रियकर तरुणाची आई होती. ती मधस्थीला गेली. मात्र मारकुंड्या एक्सने प्रियकराच्या आईच्या बोटाला तिने चावा घेतला. तर खाली पडलेल्या प्रियकरावर दगड उचलून त्याच्या कानाजवळ जोरदार वार केला. या हल्ल्यात मुलगा व आई दोघेही रक्तस्राव होऊन जखमी झालेत. ड्रामा सुरु असल्याने परिसरात लोकांची गर्दी जमू लागली. त्यामुळे तरुणीने तिथून पळ कढला.
जखमी अवस्थेत आई व मुलगा दोघेही वणी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणीविरोधात बीएनएसच्या कलम 115(2), 118(1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेची परिसरात खमंग चर्चा रंगत आहे.



Comments are closed.