…. आणि सेवानिवृत्त शिक्षकांची जल्लोषात काढली मिरवणूक
43 वर्षांनंतर आदर्श हायस्कूलचे विद्यार्थी पुन्हा एकत्र
बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील घोन्सा येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर शनिवारी एका वेगळ्याच भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरला. सन 1982-83 मध्ये दहाव्या वर्गात शिकणारे विद्यार्थी तब्बल 43 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या प्रांगणात स्नेहबंध सोहळा उत्साहात पार पडला.
शाळेच्या बसथांब्यापासून माजी शिक्षकांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मोहनराव उपरे, मुके, रमेश खनगन, श्यामसुंदर बोढे, चटकी, वसंत उपरे, चेडे तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक गौरकार यांचे विद्यार्थ्यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले. जुन्या आठवणींनी भारावलेल्या या क्षणी शाळेचा प्रत्येक कोपरा पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखा वाटत होता.
संचलनाची जबाबदारी राजेंद्र पथाडे यांनी सांभाळली. या सोहळ्यासाठी भाऊराव वासेकर, गजानन मत्ते, शैलेंद्र पारख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बंडू वांढरे, मंदा निखाडे, मनोहर निब्रड, माया चटकी, महेंद्र बहादे, प्रभाकर माथूलकर, रेखा दूधगवळी, राजेश पळवेकर, लता आवारी, विलास एकरे, दिनकर येसेकर, कांता बद्रे, विलास भटवलकर यांसारखे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ जुन्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मिलनापुरता मर्यादित नव्हता. सध्या शिकत असलेले विद्यार्थी आणि कार्यरत शिक्षक यांचाही उत्साहपूर्ण सहभाग होता. जुन्या आठवणींना उजाळा देताना नव्या पिढीला जोडणारा हा स्नेहबंध कार्यक्रम माजी शिक्षकांच्या सान्निध्यात साजरा झाला. या अनोख्या क्षणी माजी शिक्षकांसोबत कार्यरत शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला आणि शाळेच्या प्रांगणात पिढ्यांना जोडणारा भावनिक पूल उभा राहिला.

सर्व माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे आणि सामाजिक कार्यकर्ते गीतघोष उपस्थित होते. राजूरकर यांनी आभार मानून सोहळ्याची सांगता केली. या पुनर्मिलनाने केवळ शाळेच्या भिंतीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनातही जुन्या दिवसांची गोड आठवण पुन्हा जागवली. 43 वर्षांनंतरचा हा स्नेहबंध सोहळा घोन्सा गावासाठी एक संस्मरणीय क्षण ठरला.



Comments are closed.