जीर्ण शाळा, चिमुकल्यांचा जीव धोक्यात; पालक संतप्त
शाळेची भिंत कोसळली, नवीन वर्ग खोल्यांची विजय पिदूरकर यांची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ज्या शाळेत चिमुकल्यांचे भविष्य घडते, त्याच शाळेची भिंत वर्ग सुरू असताना अचानक कोसळल्याने कवडशी येथे खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वणी तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी ही घटना घडली. शाळेच्या धोकादायक दोन वर्गखोल्या तातडीने पाडून त्याठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, या मागणीसाठी माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेतील दोन वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, या वर्गखोल्या पाडून त्यांच्या जागी नवीन दोन वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून डिसेंबर 2025 पासून सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात पंचायत समिती, शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊनही समस्या मांडण्यात आली आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, शाळेच्या वर्गखोलीचा एक भाग यापूर्वीच कोसळला होता. त्यानंतर आता शाळा सुरू असतानाच वरांड्याची भिंत कोसळल्याने शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयात भरविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते शेड उभारण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पिदूरकर यांच्या नेतृत्वात निवेदन
माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पालक व नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शाळेतील धोकादायक दोन वर्गखोल्यांचे निर्लेखन करून त्या पाडण्यास तातडीने मंजुरी द्यावी. तसेच समग्र शिक्षा, जिल्हा नियोजन अथवा खनिज विकास निधीतून नवीन दोन वर्गखोल्या मंजूर करून त्यांच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
खानबाधित क्षेत्राचा निधी देण्याची मागणी
कवडशी गाव खानबाधित क्षेत्रात येत असून, बेलोरा-नायगाव व मुंगोली कोळसा खाणी गावापासून 5 किलोमीटरच्या आत आहेत. त्यामुळे खनिज विकास निधीतून शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या सरकारी शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा राज्यात गाजत असताना. दुसरीकडे कवडशी येथे शाळेची भिंत कोसळल्याची घटना समोर आळी आहे. शाळेची जीर्ण अवस्था आणि वारंवार घडणाऱ्या दुर्घटना पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाहीपुरते मर्यादित न राहता धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने निर्णय घेते, याकडे कवडशी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



Comments are closed.