बहुगुणी डेस्क, वणी: चोर आया, चोरी किया, पोलीस आया, पकड लिया…. हे लहानपणीचे बडबडगीत जवळपास सर्वांनाच माहिती असेल. असाच एक प्रकार नांदेपेरा येथे घडला. चोर हॉटेलमध्ये चोरी करण्यास शिरला. मात्र परत निघताना अचानक हॉटेल मालक आले. चोराने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र गावक-यांनी शेवटी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलेच. ही घटना मंगळवारी दिनांक 10 फेब्रुवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.
तक्रारीनुसार, फिर्यादी उषा तुकाराम डाखरे यांचे नांदेपेरा येथील बसस्टँडजवळ महालक्ष्मी नावाने नाष्टा सेंटर आहे. त्यांच्या मुलासह त्या नाष्टा सेंटर चालवतात. मंगळवारी दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उषा डाखरे या त्यांनी नाष्टा सेंटर बंद केले व त्या सामान आणण्यासाठी वणीला गेल्या होत्या. जाताना त्यांनी हॉटेल लॉक केले व ड्रॉवरमधे असलेल्या 5 हजारापैकी दीड हजार त्यांनी मालासाठी सोबत घेतले होते. तर ड्रॉवरमध्ये ₹3500 होते.
संध्याकाळी 7.30 वाजता त्या परत आल्या. उषा व त्यांच्या मुलाने हॉटेलचे शटर उघडले. मात्र त्याच वेळी आत लपलेला चोर अचानक बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र डाखरे यांचा मुलगा कुणाल याने चोराला धडक दिली आणि पाठलाग सुरू झाला. त्यांनी चोर चोर म्हणून आरडा ओरड केली असता गावकरी देखील जमा झाले. त्यांनी चोराला पकडले. ठेवले. गावक-यांनी पळून जाणा-याला नाव विचारले असता त्याने अजय रामदास दंडाजे (वय 28, रा. पोहणा) असल्याचे सांगितले.
आरोपीने मागच्या दरवाजातून हात घालून कडी उघडून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि ड्रॉवरमधून ₹3500 चोरल्याचेही कबूल केले. गावकऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात अगदी तेवढेच ₹3500 सापडले यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर बीएनएस कलम 305(a) व 334 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश – शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई





Comments are closed.