बहुगुणी डेस्क, वणी: रंगारीपुरा परिसरातील एका घरात सुरू असलेला “घरगुती कॅसिनो” अखेर पोलिसांच्या छाप्याने उधळला गेला. बुधवारी (दि. 11 फेब्रुवारी) दुपारी वणी पोलिसांनी अचानक धाड टाकत सात जणांना 52 गंजी पत्त्यांवर जुगार खेळताना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ₹7,220 रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रंगारीपुरा येथील विवेक नारायण उके यांच्या घरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे समजताच पोलीस पथकाने दुपारी 3.35 ते 4.00 या वेळेत सापळा रचत छापा टाकला. घरात प्रवेश करताच सात जण टेबलाभोवती 52 गंजी पत्त्यांवर पैशांचा डाव खेळत असल्याचे आढळले. पोलिसांनी घरात झडती घेतली असता टेबलावर व खाली 52 गंजी पत्ते व ₹1,650 रोख आढळले. त्यानंतर सातही आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशातून वेगवेगळी रक्कम सापडली.
यात विवेक नारायण उके (40), रा. रंगारीपुरा – जवळून नगदी ₹550/-, शेख रफिक शेख मेहबूब (41), रा. पंचशील नगर – जवळून नगदी ₹1,020/-, अशोक नामदेव नागदिवे (68), रा. फाले ले-आऊट – जवळून नगदी ₹1,070/-, गणपत भिकाजी वाढई (72), रा. आवारी ले-आऊट – जवळून नगदी ₹500/-, प्रकाश पुंडलिक कोंडमवार (50), रा. सरोदे चौक – जवळून नगदी ₹1,030/-, सुमित सुभाषराव कोनप्रत्तीवार (30), रा. प्रगती नगर – जवळून नगदी ₹500/-, सिद्धार्थ विवेक चवरे (26), रा. सेवानगर – जवळून नगदी ₹900/-अशा प्रकारे एकूण ₹7,220 रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.
या प्रकरणी सपोनि प्रियांका चौधरी यांच्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी विशाल राठोड करीत आहेत. शहरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश – शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई





Comments are closed.