निकेश जिलठे, वणी: शिरपूर–वणी मार्गावर बुधवारी सायंकाळी शिरपूर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात एमडी (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला. चारचाकी वाहनातून ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या पुनवट येथील एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या कडून सुमारे ₹5.60 लाखांचे ड्रग्ज व वाहनासह सुमारे ₹10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा आतापर्यंतचा वणी परिसरात जप्त केलेला सर्वात मोठा ड्रग्जचा साठा आहे. या कारवाईमुळे नागपूर ते वणी दरम्यान सक्रिय असलेली ड्रग्ज साखळी उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील (वय 24, रा. पुनवट, ता. वणी) हा तरुण मुळचा पुनवट येथील आहे. तो सध्या नागपूर येथे राहून वणी व शिरपूर परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. तो नागपूरहून पुनवटला आला होता. तो वणीला ड्रग्ज डिलिव्हरीसाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने चारगाव चौकी ते वणी रोडदरम्यान एका शेताजवळ सापळा रचला. सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास श्रेयस हा त्याच्या Datsun Go (MH 32 AH 4126) या कारने चारगावकडून वणीच्या दिशेने येत होता. पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवले. त्याची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्याच्या जिन्सच्या खिशात व कारच्या ड्रॉवरमध्ये तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये पांढरट-पिवळ्या रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली. त्याला पावडर बाबत विचारणा केली असता त्याने ही पावडर एमडी (मेफेड्रोन) असल्याचे सांगितले.
सदर ड्रग्जचे वजन केल्यावर ते 56.25 ग्रॅम निघाले, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ₹5 लाख 60 हजार आहे. याशिवाय झडतीदरम्यान वाहनातून 3 डिजिटल तराजू (₹15,000) व एक रेडमी मोबाईल (₹7,000) सापडला. पोलिसांनी चारचाकी वाहनासह एकूण ₹9.82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत श्रेयस पाटील याने हा एमडी ड्रग्ज नागपूर येथील एका सप्लायरकडून घेतल्याचे व तो वणी येथील एका ड्रग्ज पेडलरकडे विक्रीसाठी नेत असल्याचे उघड केले. त्यामुळे या प्रकरणात नागपूर व वणी येथील आणखी दोघांचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
या प्रकरणी आरोपी श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील याच्यासह नागपूर व वणी येथील दोन जणांविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 21(क), 22(क) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. नागपूर-वणी दरम्यान सक्रिय असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे (वणी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडीत ठाणेदार संतोष मनवर, उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे, हेड कॉन्स्टेबल सूरज साबळे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे, इक्बाल शेख, प्रशांत झोड, परमेश्वर दराडे, किरण सोबत आदी सहभागी होते. तसेच नायब तहसीलदार उल्हास निमेकर (राजपत्रित अधिकारी), मोजमाप तज्ञ व फोटोग्राफर यांनी पंचनामा प्रक्रियेत सहभाग नोंदवला.





Comments are closed.