बहुगुणी डेस्क, वणी: लालपुलीया परिसरातील एका शनिवारी मध्यरात्री मारहाणीची घटना घडली. जेवणानंतर गप्पा करीत असताना तिथे आरोपी आला. त्याने लोखंडी रॉडने ट्रक चालकावर हल्ला केला. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी प्रवीण प्रकाश राक्षसमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी मारोती कंठीराम डिकळे (वय 35, रा. पारडी, ता. लोहा, जि. नांदेड) हे ड्रायव्हर आहे. ते सोलापूरहून साखर लोड करून त्यांच्या पुतण्यासोबत ट्रकने (MH-26BE-6249) राजुरा व बल्लारशाह येथे गेले होते. 03 जानेवारी रोजी त्यांनी ट्रक बल्लारशाह व राजुरा येथे खाली केला. रिटर्न ट्रिपमध्ये त्यांना वणी येथून कोळसा लोड करायचा होता.
रात्री लालपुलिया परिसरात ते कोळसा लोड करण्यासाठी थांबले. जवळच असलेल्या शाम शंकर हॉटेलमध्ये ते त्यांचा पुतण्या व क्लिनर जेवायला गेले. जेवणानंतर मारोती हे हॉटेलसमोर एका ड्रायव्हर मित्राशी गप्पा करीत उभे होते. दरम्यान तिथे आरोपी प्रवीण प्रकाश राक्षसमारे (वय 27, रा. सिडको, जि. नांदेड) आला. त्याने मारोतीला ‘तु गोपाल ड्रायव्हरला ओळखतोस का?’ असा प्रश्न विचारला.
मारोती यांनी नकार दिल्यावर त्याने शिवीगाळ करून वाद घातला व हॉटेलमधून लोखंडी रॉडला आणला. त्यान मारोतीवर हल्ला केला. यात मोरोती यांच्या हातावर, डोक्यावर व पाठीवर मार लागून ते जखमी झाले. घटनेदरम्यान पुतण्या माधव डिकळे व क्लिनर यांनी मध्ये पडून वाद सोडवला. त्यांनी जखमी मारोती यांना ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी नेले.
उपचारानंतर डिकळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपीवर बीएनएस कलम 118(1) व 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments are closed.