वणी पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती उपक्रम

शाळांमध्ये भेटी, पोलीस स्टेशनचा अनुभव आणि कायद्याविषयी मार्गदर्शन

विवेक तोटेवार, वणी : पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून वणी पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पोलीस–नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे हा होता.

या उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल ब्लॅक डायमंड स्कूल, आदर्श हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, आंबेडकर चौक येथील अभ्यासिका तसेच वणी शहरातील विविध शाळा व कोचिंग क्लासेसना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या. यासोबतच आदर्श हायस्कूल, भगतसिंग चौक येथील विद्यार्थ्यांना थेट वणी पोलीस स्टेशनमध्ये आमंत्रित करून प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो, तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुड टच–बॅड टच, बालसुरक्षा, नवीन कायदे व कायद्यातील बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112, 1091 व 1098 यांची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी सकारात्मक जाणीव निर्माण झाली असून पोलीस व समाज यांच्यातील नाते अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

हा जनजागृती कार्यक्रम वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी, कपिल पाटील, पीएसआय सुदाम आसोरे, अंकुश वडतकर, शुभम महानवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल कावळे, पोलीस कॉन्स्टेबल शाम राठोड व इमरान खान यांची उपस्थिती लाभली.

Comments are closed.