जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे झाली आहे. याबाबत बुधवारी दुपारी आदेश मिळाले असून मुख्याधिकारी बोरकर गुरुवारी कामठी न.प. मुख्याधिकारीचा पदभार सांभाळणार आहे. मुख्याधिकारी संदीप बोरकरच्या बदली नंतर वणी न.प.चे नवीन मुख्याधिकारी पदावर अजून कोणाचीही नेमणूक झाली नसल्याची माहिती आहे.
मुख्याधिकारी संदीप बोरकर हे 12 जून 2017 रोजी वणी न.प. मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याची माहिती आहे. मृदुभाषी आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप बोरकर यांच्या कार्यकाळात वणी न.प. अंतर्गत अनेक विकास कामे पूर्णत्वास आले. विशेषतः मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणी पुरवठा योजना मुख्याधिकारी बोरकर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली असून वणीकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमीसाठी सुटली आहे.
नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत समन्वय साधून वणी शहरात करोडों रुपयांचे सिमेंट रस्ते, भूमिगत गटार, सांस्कृतिक भवन, बगीचे विकासकामे व इतर अनेक प्रलंबित कार्य मागील 3 वर्षात पूर्ण झाले. कोरोना काळात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी अत्यंत नियोजनपूर्वक परिस्थिती हाताळली असून वणी शहरात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
बोरकर यांच्या काळात अनेक विकासकामे: तारेंद्र बोर्डे
वणी न.प. चे मुख्याधिकारी संदीप बोरकर एक चांगले आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे शहरात मागील तीन वर्षात अनेक नवीन आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण झाले. नगर परिषद पदाधिकारी व जनते सोबत नेहमी सहकार्याच्या भावनेतून त्यांनी कामे केली. नवीन येणारे मुख्याधिकारीसुद्दा वणी शहराचे विकास करणार याची खात्री आहे.
तारेंद्र बोर्डे : अध्यक्ष न.प. वणी