वणीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन

लॉकडाऊन हटवण्याची व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊऩ व सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. त्यासोबतच सध्या घातलेल्या जिल्हा बंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे ताबडतोब लॉकडाऊऩ उठवावे व सार्वजनिक वाहतूक सुरू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

आज राज्यभरात वंचित आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन पुकारण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणीतही हे आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत डफली वाजवत मोर्चा काढत सरकारचा निषेध करीत हे आंदोलन केले. आंबेडकर चौकातून डफली वाजवत या आंदोलनाला सुरूवात झाली. बस डेपोवर या मोर्चाची सांगता झाली. यावेळी सरकार विरोधी व लॉकडाऊन हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चानंतर उपविभागीय अधिका-यांना लॉकडाऊन हटवणे, वाहतूक व्यवस्था सुरू करणे यासाठी इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लॉकडाऊऩमुळे गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. करोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्‍के लोकांनी दाखवली आहे. 15 टक्‍के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन व वाहतूक व्यवस्था बंद करण्याची गरज नाही. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आली आहे.

सार्वजनिक उत्सवासाठी खासगी बसेसला प्रशासन परवानगी देत आहे. मात्र महामंडळाच्या गाड्यांना परवानगी का दिली जात नाही असा सवाल वंचित आघाडीने उपस्थित केला आहे. त्यामुळे आज डफली बजाव आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात वणीतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिंकवर क्लिक करून पाहा आंदोलनाचा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.